आयुष्मान भारत मिशनचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत मिळावा – डॉ. ओमप्रकाश शेटे

बीड,२९ डिसेंबर / प्रतिनिधी :- जिल्ह्यातील  सर्व वयोगटातील नागरिकांना आयुष्मान भारत मिशन अंतर्गत योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे डॉ. शेटे यांच्या अध्यक्षतेत आयुष्मान भारत/ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांची प्रमुख उपस्थिती  होती. जिल्हा रूग्णालय, शासकीय रूग्णालय, खाजगी  रूग्णालयांचे प्रमुख याबैठकीस उपस्थित होते. केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या आरोग्य  योजनांचा लाभ जिल्ह्यातील  सर्व स्तरातील नागरीकांना मिळावा याकरीता “विकसित भारत संकल्प यात्रा २०२४” अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांची आढावा बैठक डॉ.  शेटे यांनी घेतली.

यावेळी डॉ. शेटे यांनी जिल्हयातील  सध्या स्थितीची माहिती जाणून घेतली. यामध्ये आयुष्यमान भारत अंतर्गत देण्यात येणारे ओळखपत्र अधिकाधिक लोकांना मिळावे, यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यातंर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरीकांना या योजनेचा लाभ मिळवा, यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. डॉ. शेटे या जिल्ह्याचे भूमिपुत्र  असल्यामुळे जिल्ह्यातील जनआरोग्य सेवा अधिक सुदृढ व्हावी यासाठीची भावना असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शासनाच्या यादीवर असणाऱ्या ठराविक  खाजगी रूग्णालयात रूग्णांवर इलाज केला जातो. मात्र, शासन यादीवरील रूग्णालयाला ठरवून दिलेले दर हे मागील 10-12 वर्ष जुने असून हे वाढविण्यात यावे, अशी विनंती खाजगी रूग्णालयाच्या उपस्थित प्रतिनिधींनी केली. यावर याबाबत सर्वंकष विचार केला जाईल असे आश्वासन देऊन याबाबत एक समिती नेमली जाईल, यामध्ये शासकीय,निमशासकीय, खाजगी रूग्णालयातील वैद्यकीय विभागाचे प्रमुख नेमून अंतिम दर ठरविण्यात येतील, असे श्री शेटे यांनी सांगीतले. यासह महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत अधिक आजांराचा समावेश करून रूग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचेही  डॉ. शेटे यांनी यावेळी माहिती दिली.

जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या  शासकीय पायाभुत सुविधांच्या बाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. वर्ष 2023-24 आणि 2024-25 या वर्षासाठी पायाभूत सूविधांकरीता आराखडा निश्चित केला आहे. यासाठी शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या मंजूरी लवकरात लवकर मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे डॉ. शेटे याप्रसंगी म्हणाले.

आयुष्मान भारत कार्ड नोंदणी प्रक्रियेला गती द्यावी

जालना, २९ डिसेंबर / प्रतिनिधी :-  सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा मोफत व अधिक दर्जेदार मिळाव्यात यासाठी शासनामार्फत कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत  राबविण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लक्ष रुपयांपर्यंत उपचार मोफत स्वरुपात देण्यात येत असल्याने या योजनेच्या माध्यमातून आयुष्मान भारत कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देण्याचे निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत डॉ. शेटे बोलत होते. त्यांनी आयुष्मान भारत/महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, महानगर पालिकेचे  आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक विजय भुतेकर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या समन्वयक  विद्या मस्के आदींसह तालुका आरोग्य अधिकारी, खाजगी रुग्णालय व सीएससी केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुष्य भारत मिशन हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, असे सांगून डॉ. शेटे म्हणाले की, प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत आयुष्मान भारत मिशन हे रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. महाराष्ट्रात अनेक सर्वसामान्य रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के हिस्सा देण्यात येतो. जालना जिल्ह्यात आयुष्मान भारत कार्डचे वितरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची या कार्डासाठी नोंदणी करावी तसेच स्वस्त धान्य दुकानावर शिधा घेण्यासाठी येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची कार्डासाठी नोंदणी करावी व पात्र लाभार्थ्यांना कार्डाचे वितरण करावे. हे काम मिशन मोडवर राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे.

जालना येथील शासकीय रुग्णालयात मनुष्यबळाची निकड लक्षात घेता तीन आरोग्य मित्रांची तात्काळ नियुक्ती करावी, अशी सुचनाही डॉ. शेटे यांनी केली. महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रात पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने या स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करुन आयुष्मान भारत कार्ड वितरणाचा दैनंदिन आढावा घेण्यात यावा, असे सांगून आरोग्य मित्र व जिल्हा समन्वयक यांना किमान वेतन मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

बैठकीस उपस्थित खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून डॉ. शेटे यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.  आरोग्य मित्र खूप चांगले काम करत असल्याबाबतची माहिती खाजगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी दिली असता खाजगी रुग्णालये या योजनेविषयी समाधानी असल्याने आनंद वाटला असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांनी राष्ट्रीय कार्य समजून अधिकाधिक आयुष्मान भारत कार्डची नोंदणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रेतंर्गत गावागावांत जावून आयुष्मान भारत कार्डची नोंदणी करुन लाभार्थ्यांना कार्ड वितरित करण्यात येत आहे. दररोज जवळपास दोन हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांची कार्डसाठी नोंदणी करण्यात येत आहे. जालना जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात  कार्ड वितरणास गती देऊन उदिष्ट वेळेत पूर्ण केले जाईल. प्रारंभी विजय भूतेकर, विद्या मस्के यांनी योजनांच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.