मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका शेतकऱ्याने रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून पोलिसांनी आत्मदहनापासून परावृत्त केले असून त्याच्याकडून ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले आहे.

साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख वय ४५ हे शेती विषयक प्रश्नाच्या मागणी करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यतिथ झालेल्या देशमुख यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, विधान भवन परिसरातील आत्मदहन प्रकरणावर सभागृहात चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना थेट धारेवर धरले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही या प्रकरणाची माहिती घेतली असून संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच त्याला सर्व मदत केली, जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

त्याआधी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. १८ लाख हेक्टर नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करायला पाहिजे होते. मजुराला एकरकमी मदत करण्याची मागणी केली होती, पण तीही विचारात घेतली नाही, असा आरोप अजित पवारांनी केला.