कोविड च्या पार्श्वभूमीवर घरी राहूनच सर्व नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा

लातूर,२०जून /प्रतिनिधी :- केंद्र शासनाने दरवर्षीप्रमाणे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याविषयी कळविले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने एकत्रित येण्यास बंदी असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घरामध्ये बसूनच जिल्हाधिकारी लातूर यांच्या फेसबुक पेज वरून लाईव्ह  योग प्रात्यक्षिके करून योग दिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.     

21 जून 2021 रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा “Be with yoga Be at home” या संकल्पनेवर आधारित असून यावर्षीचा योग दिन हा सातवा योग दिन आहे. त्यामुळे या संकल्पनेवर प्रत्येकाने घरांमध्ये राहून सुरक्षित अंतराचे पालन करून योगाभ्यास करावा अशा सूचना मुंबई येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक यांनी दिल्या आहेत.       

लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने covid-19 या पार्श्‍वभूमीवर कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तंतोतंत पालन करून हा आंतरराष्ट्रीय योग दिन क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉल येथून जिल्हाधिकारी लातूर यांच्या फेसबुक पेज वरून सकाळी सात ते आठ वाजता या कालावधीत साजरा होणार आहे. या फेसबुक पेज वरून योगाभ्यासाची प्रात्यक्षिके दाखवली जाणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्या पेजवर जाऊन लाइव योग प्रात्यक्षिके सुरक्षित अंतर ठेवून घरीच करावेत असे करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, आरोग्य उपसंचालक डॉक्टर एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लक्ष्‍मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, आयुष विभागाचे अधिकारी डॉक्टर विकास पाटील यांनी केले आहे.     दिनांक 21 जून 2021 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रात्यक्षिक सादर होण्यापूर्वी काही कालावधी अगोदर समाज माध्यमे व फेसबुक पेज वरून लिंक पाठवण्यात येणार आहे.