देशाला सर्वच क्षेत्रात अग्रेसर ठेवण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आवाहन

मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळातील प्रत्येक सदस्य तसेच नागरिक येणाऱ्या काळात राज्याला आणि देशाला उत्कृष्ट राज्य आणि देश म्हणून ओळख देण्यासाठी निश्चितपणे परिश्रम करत देशाला सर्वच क्षेत्रात अग्रेसर ठेवण्याचे आवाहन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सभागृहाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रस्ताव सभागृहात मांडला होता. या प्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष बोलत होते.

अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे आराध्य दैवत आहेत. स्वातंत्र्याची खरी जाणीव शिवछत्रपतींनी या देशाला करून दिली. सन १८५७ चा राष्ट्रीय उठाव, लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ हा दिलेला मंत्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याला दिलेली दिशा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारांच्या बलिदानातून भारताचे स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी उदयास आले. देशात अत्यंत गुंतागुंतीचे तंत्रज्ञान असलेल्या  उपग्रहांची निर्मितीही केली जात आहे. आपलेच नव्हेतर इतर देशांचे उपग्रह आकाशात सोडण्याची क्षमता आपण निर्माण केली आहे. 1947 मध्ये देशापुढे सर्वात मोठा प्रश्न होता तो भुकेचा. भारताने हरितक्रांतीचे उद्दिष्ट साध्य करीत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता मिळविली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. त्याचा आनंद प्रत्येक सदस्याला आहे. देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची पण हीच भावना आहे, असे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सांगितले.

या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ, डॅा. विश्वजीत कदम यांनी मते मांडली.