राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरूतुल्य मूर्ती काळाच्या पडद्याआड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १ :- धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मूर्ती काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले.  विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी  मार्गदर्शक असेच आहे. शिवाचार्य महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!

मानव कल्याणासाठी कार्यरत ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले

महाराष्ट्राच्या सामाजिक, आध्यात्मिक चळवळीची मोठी हानी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे विज्ञान व अध्यात्माची सांगड घालत मानव कल्याणासाठी कार्य करणारं ऋषीतुल्यं व्यक्तिमत्वं होते. समाजप्रबोधन, जातीनिर्मुलनाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीसाठी मोलाचं योगदान दिलं. ते सोबत नसणं ही राज्याच्या, देशाच्या सामाजिक, अध्यात्मिक चळवळीची मोठी हानी आहे. महाराजांच्या लाखो भक्तांवर आज दु:खाचा डोंगर कोसळला असून आम्ही सर्वजण या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना अभिवादन करुन श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळवलेले मराठवाड्यातील पहिले डॉक्टर होते. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल त्यांनी तुरुंगवास भोगला होता. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी देशाच्या, समाजाच्या, मानवतेच्या कल्याणासाठी अर्पण केलं. त्यांचं कार्य अखंड मानवजातीच्या कल्याणाचं कार्य होतं म्हणूनच ते राष्ट्रसंत ठरले. महाराजांनी दिलेले विचार, केलेलं कार्य पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या निधनाने वीरशैव समाजाचा दीपस्तंभ हरपला! – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. विरशैव परंपरा खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र शास्त्रोक्त पद्धतीने रुजवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामध्येही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या निधनाने विरशैव समाजाचा दीपस्तंभ हरपला, अशा शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले होते पण या क्षेत्रात त्यांचे मन रमले नाही. विरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यासाठी त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी दोनवेळा तुरुंगवासही भोगला..

विरशैव तत्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संस्कृत, उर्दू, मोडी, पारसी, इंग्रजी, कन्नड, मराठी अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभृत्व होते. त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. धार्मिक, सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही शिवाचार्य महाराजांचे कार्य उल्लेखनीय आहे. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी गाव खेड्यात शिक्षणाची गंगा पोहोचवली. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे त्यांच्या कार्यातून लिंगायत समाजाच्या कायम स्मरणात राहतील, अशी श्रद्धांजली थोरात यांनी अर्पण केली.

महाराजांच्या विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच त्यांना श्रद्धांजली – पालकमंत्री अशोक चव्हाण

 “वार्धक्याला झुगारून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शांत चित्ताने मुक्तीची वाट पाहिली. आयुष्यभर अध्यात्मासमवेत समाज सेवेचे व्रत त्यांनी बाळगले. लाखो भक्तांना त्यांनी विवेकाचा मार्ग दाखवित अंधश्रद्धेविरुद्ध जागर सुरु ठेवला. वास्तवाशी आणि सत्याच्या जवळ जाणारे त्यांचे बोल असल्याने त्यांच्या शब्दाला भक्तांनी प्रमाण मानले. सतत समाजाच्या भल्याचा विचार आपल्या कृतीतून चालू ठेवणारा एक दीप आता मालवला आहे” या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नांदेड येथील डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी हॉस्प‍िटला भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली होती. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या देहावसानामुळे सर्व भक्तांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खाला सावरुन त्यांनी आयुष्यभर आपल्या कृतीतून दिलेला विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच खरी त्यांना श्रद्धांजली असल्याच्या भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

शिवाचार्य महाराज यांच्या निधनाने अपरिमित हानी – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने समाजाची अपरिमित हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

अहमदपूरकर महाराज यांचे नुकतेच निधन झाले असून मृत्यूसमयी त्यांचे वय १०४ वर्षे होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते. महाराजांच्या निधनाने महाराष्ट्रासह विविध राज्यातील त्यांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे.

महाराजांचे ८२वे श्रावणमास तपोनुष्ठान वैद्यांचा नाथ असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीत झाले होते, त्याचे स्वागताध्यक्ष म्हणून महाराजांचा सहवास मला लाभला. स्वातंत्र्यपूर्व काळात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या अहमदपूरकर महाराजांनी आपले संपूर्ण जीवन लोककल्याणकारी, समाजाभिमुख तसेच राष्ट्रभक्ती शिकवणारे सामाजिक काम करण्यात घालवले. वयाच्या १०४व्या वर्षी देखील ते कार्यात व्यस्त असत, त्यांचे जीवन आदर्शवत व प्रेरणादायी होते. जलपुनर्भरण, वृक्ष लागवड व संवर्धन या क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे हे योगदान समाज कधीही विसरणार नाही; असेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी नांदेड येथील संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या प्रकृती बाबत विचारणा केली होती आणि आज त्यांच्या निधनाचे वृत्त धडकले, महाराजांच्या जाण्याने समाजाची अतोनात हानी झाली असून, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही श्री.मुंडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *