मांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती

मुंबई, १५ मे /प्रतिनिधी :- मांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कामांना नियामक मंडळाच्या आगामी बैठकीत मंजुरी देण्यात येईल आणि या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

लातूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमधील कामांच्यासंदर्भात शुक्रवारी मंत्रालयात जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी हे आश्वासन दिले. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, जलसंपदा सचिव संजय घाणेकर, टी. एन. मुंडे, संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सातत्याने पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या लातूर जिल्ह्यासाठी पाटबंधारे प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याबरोबरच पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. लासरा बॅरेजमधील अतिरिक्त पाणी रायगव्हाण प्रकल्पात वळविण्याच्या कामाला यापूर्वी मंजुरी देण्यात आली होती. या योजनेचा नव्याने अभ्यास करून याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले आहेत.

मांजरा नदीवरील सर्वच बॅरेजद्वारे परिचलनासाठी ‘स्काडा’ प्रणाली बसविणे बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. त्याचप्रमाणे मांजरा धरणातील पाण्याचा अधिक कार्यक्षमतेने वापर व्हावा यासाठी मांजरा प्रकल्पाच्या कालव्यावर बंद पाईपद्वारे पाणी वितरण प्रणाली बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

लातूर जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदीच्या संगमाजवळ बॅक वॉटर इफेक्ट स्टडी करण्यासाठी नदी खोरे अभिकरणास सूचना द्याव्यात, मांजरा धरणाच्या खाली वाहून जाणाऱ्या पाण्याचा त्याच खोऱ्यातील कोरड्या प्रकल्पासाठी वळण योजना प्रस्थापित करण्याबाबत अभ्यास करण्यात यावा असेही बैठकीत ठरविण्यात आले.

या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयांचा आढावा घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घेण्यात येईल असेही जलसंपदा मंत्री यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांनी त्यांचे आभार मानले आहेत.