राज्यात किमान ५ मोठ्या शासकीय रुग्णालयांत लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

‘एम्स’च्या धर्तीवर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित २७ रुग्णालये सुसज्ज होणार

कोल्हापूर,८ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-  शासकीय रुग्णालयात मोठमोठ्या शस्त्रक्रियेची सुविधा व प्रत्यारोपण व्यवस्था नाही. गोरगरिबांसाठी  राज्यातील 27 पैकी महत्त्वाच्या 5 ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात येत्या तीन ते चार महिन्यात लिव्हर व किडनी प्रत्यारोपण सुविधा सुरू करणार असल्याचे  राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अत्याळ, कोल्हापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी सांगितले.

नांदेडसारख्या दुर्दैवी घटना राज्यात पुन्हा होऊ नयेत म्हणून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासह त्या सुसज्ज करण्याचे कार्य शासनाने हाती घेतले आहे. शासकीय रुग्णालयांवर नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त ताण असतो. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाबरोबरच जर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अधिक बळकट केली तर मुख्यालयात असलेल्या जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होईल. यातून गरजूंना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 

‘एम्स’च्या धर्तीवर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित २७ रुग्णालये सुसज्ज होणार

गोरगरीब लोकांना मोफत उपचार देण्यासाठी धर्मादाय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच पाहायला मिळाला असून हा चांगला उपक्रम राज्यातील सर्व घटकांना आदर्श निर्माण करेल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कोल्हापूर येथे धर्मादाय संघटना महाराष्ट्र राज्य व धर्मदाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरात उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले राज्यात मोठ्या प्रमाणात धर्मदाय रुग्णालये असून त्यांच्याकडून सर्वसामान्य गोरगरिबांना शासनाच्या कायद्याप्रमाणे मोफत वैद्यकीय सेवांचा लाभ देणे आवश्यक आहे.  धर्मदाय रुग्णालय तसेच सर्वच शासकीय-खाजगी रुग्णालयांनी प्रामाणिकपणे आरोग्य सेवा करून रुग्णांना मदत करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारख्या महत्त्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी यशस्वीपणे करण्याची जबाबदारी सर्व आरोग्य यंत्रणेवर आहे. राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्नित २७ रुग्णालये असून येत्या काळात त्या सर्व रुग्णालयांमध्ये एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज सेवा देण्याचे काम विभागामार्फत करण्यात येणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आरोग्य मंत्री तानाजी सावंत व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडले.

रुग्णांना धर्मादाय रुग्णालयातील सेवा घेण्यासाठी मोबाईल ॲप सुरू करणार – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

धर्मादाय रुग्णालयांमधून सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळत नसल्याच्या नेहमीच तक्रारी शासनाकडे येत असतात. यासाठी रुग्णांना घरी बसूनच यापुढे धर्मदाय रुग्णालयातील आपले बेड मोबाईल ॲपच्या द्वारे आरक्षित करता येणार आहे. यासाठी मोबाईल ॲप सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या दिवाळीपूर्वी रुग्णांना याद्वारे कोणत्याही इच्छित धर्मदाय रुग्णालयात आपल्याला आवश्यक असलेली सेवा सहज घेता येणार आहे असे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. शासकीय आरोग्य योजना तसेच धर्मदाय रुग्णालयातील मोफत आरोग्य सेवा याबाबतची माहिती देण्यासाठी प्रत्येक धर्मदाय रुग्णालयात त्यांच्याकडूनच नेमलेला कर्मचारी असतो. मात्र याबाबतची माहिती येणाऱ्या रुग्णांना योग्य प्रकारे दिली जात नसल्याने आता यापुढे आरोग्य विभागामार्फत नेमलेल्या आरोग्य दूताकडून संबंधित गरजू रुग्णांना आरोग्य सेवेबद्दलची माहिती दिली जाणार आहे असे ते पुढे म्हणाले. शासनाकडून मोफत व आवश्यक आरोग्यसेवा देण्यासाठी येत्या काळात सनियंत्रण प्रणाली चांगल्या प्रकारे करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. राज्य शासनाने आरोग्य विभागामार्फत घेतलेल्या ऐतिहासिक 22 निर्णयांबाबतची माहिती यावेळी आरोग्यमंत्री सावंत यांनी उपस्थितांना दिली. आरोग्य विभागा अंतर्गत येणाऱ्या दवाखान्यांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची भरतीही येत्या काळात होणार आहे. अपुऱ्या मनुष्यबळावरही राज्यातील आरोग्य सेवक चांगल्या प्रकारे काम करत असून येणारा अतिरिक्त ताण सहन करून गरजूंना आरोग्यसेवा दिल्याबद्दल त्यांनी आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे यावेळी अभिनंदन केले. मोफत उपचार योजना यामुळे आता राज्यात शासकीय दवाखान्यात ओपीडी वाढली आहे. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण शासकीय आरोग्य सेवांचा लाभ घेत आहेत. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असून यामध्ये राज्यात कोणीही राजकारण न करता सर्वांनी मिळून ही सेवा चांगल्या प्रकारे लोकांना देण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहनही आरोग्य मंत्री सावंत यांनी यावेळी केले.