राष्ट्रवादीत फूट नाही! शरद पवार गटाचा युक्तिवाद; बहुसंख्य लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याचा अजित पवार गटाचा दावा

शरद पवार यांच्या गटाची अजित पवारांसह ९ जणांवर कारवाई करण्याची मागणी

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही फूट पडलेली नसून अजित पवार गटाने केलेला फुटीचा दावा पूर्णपणे काल्पनिक असल्याचा युक्तिवाद शरद पवार यांच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीमध्ये करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कथित फुटीवर शुक्रवारी दोन्ही गटांकडून प्राथमिक मुद्दे मांडण्यात आले. पुढील सुनावणी सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असून त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्याशिवाय पक्षामध्ये फूट पडल्याच्या कथित प्रकरणावर सुनावणी घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग कसा घेऊ शकतो, असा आक्षेपाचा मुद्दा त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवादादरम्यान मांडला.

शरद पवार यांच्यावर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांचे वागणे लोकशाहीवादी नाही. ते पक्षात मनमानी करत आहेत. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होण्याआधीच प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड कशी झाली? जयंत पाटील यांची नियुक्ती पूर्णपणे बेकायदा आहे. त्यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही बेकायदा ठरते, असा युक्तिवाद अजित पवार यांच्या वतीने  नीरज कौल यांनी केला. अजित पवार गटाकडे आमदारांचे बहुमत असल्याने अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पक्षातील विधानसभेतील ४३ , विधान परिषदेतील ६ आमदार तसेच, लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी एक असे दोन खासदार अजित पवार गटात सामील झाले आहेत, अशी माहिती आयोगाला देण्यात आली.

जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला

मनिंदर सिंह यांनी यावेळी राष्ट्रवादी  पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची झालेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला. या युक्तिवादावर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील म्हणाले, मीच बेकायदेशीर असेन, तर माझी सही असलेला एबी फॉर्म भरून निवडून आलेले राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार बेकायदेशीर ठरतील.

जयंत पाटील म्हणाले, माझी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माझ्याच सहीने राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. मीच जर बेकायदेशीर असेन तर मग महाराष्ट्रातील सगळ्या (राष्ट्रवादी काँग्रेसच्या) निवडून आलेल्या आमदारांच्या निवडी बेकायदेशीर ठरवण्याचा डाव यात दिसतोय. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी मी निवडणूक लढून निवडून आलोय. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनीच मला पत्र देऊन माझी पुन्हा निवड केली. माझ्याकडे प्रफुल पटेलांचंच पत्र आहे.