अन्याय दिसेल तिथे लाथ बसलीच पाहिजे! मराठी महिलेला घर नाकारल्यानंतर राज ठाकरे उतरले मैदानात

मुंबई : मुंबईतील मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याच्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात असे पुन्हा घडले तर गालावर वळ उठतील हे निश्चित,” असा इशारा त्यांनी दिला. सोबतच “अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे,” असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले आहे.

मुलुंडमधील एका इमारतीत तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, जो तुफान व्हायरल झाला.तृप्ती यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिक मुलुंडमधील संबंधित इमारतीत पोहोचले. जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राला तृप्ती यांची माफी मागायला लावली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. त्यानंतर तृप्ती देवरुखकर यांनी बुधवारी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपी प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांना रात्री ताब्यात घेतले.

मुंबईतील, मुलुंड परिसरात एका मराठी महिलेला मराठी असल्याकारणाने व्यवसायासाठी जागा नाकारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा इतरांनी निषेध वगैरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहीत नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यवर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

मुंलुंड प्रकरणातील जागा नाकारली गेलेली महिला तृप्ती देवरूखकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचल्या होत्या. या भेटीनंतर राज ठाकरे काय प्रतिक्रया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. राज ठाकरे यांनी त्यांची प्रतिकिया दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घर नाकारण्याच्या घटनेवरून संताप व्यक्त केला असून सोसायटीला धडा शिकवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना शाबासकी दिली आहे.

राज यांनी सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, ‘मुंबईतील मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वगैरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहीत नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत तसंच महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. असं राज म्हणाले.

या प्रकरणावर बोलताना राज ठाकरे पुढे म्हणाले की, सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे.

अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!’ असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसैनिकांचं कौतुक केलं आहे.