राणे यांना सूडबुद्धीने अमानुष वागणूक तरीही त्यांची जन आशिर्वाद यात्रा होणारच

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

मुंबई ,२५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केल्यामुळे सत्याचा विजय झाला आहे. ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अमानुष वागणूक दिल्यामुळे मा. नारायण राणे यांची तब्येत बिघडली. पण ते बरे झाल्यानंतर त्यांची कोकणातील जन आशिर्वाद यात्रा लवकरच पुन्हा सुरू होईल, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांना सांगितले.

            चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी महाविकास आघाडी सरकारकडून अत्यंत अमानुष व्यवहार झाला. त्यांना पोलिसांनी अटक केली त्यावेळी ते जेवत असताना हातातले ताट काढून घेतले गेले. त्यांना अडीच तास संगमेश्वर पोलीस स्थानकात बसवून ठेवले. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे आणि रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना उपचार देण्याची गरज आहे, असे डॉक्टरांनी अटक करताना सांगूनही वैद्यकीय उपचार दिले नाहीत. यामुळे राणेसाहेबांची तब्येत बिघडली. तथापि, विश्रांती घेतल्यानंतर राणेसाहेबांची तब्येत सुधारली की लवकरच त्यांची जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरू होईल.

            त्यांनी सांगितले की, राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला मुंबई आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे घाबरलेल्या ठाकरे सरकारने त्यांना अटक केली. आता सरकारने घाबरून सिंधुदूर्ग जिल्ह्यात काल रात्री बारापासून सात दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. पण त्याने भाजपाला फरक पडत नाही. राणेसाहेबांची तब्येत बरी झाली की पुन्हा यात्रा सुरू होईल.

            ते म्हणाले की, राज्यात काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ हा पूर्णपणे सूडबुद्धीने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात मांडलेला कोणताही मुद्दा टिकला नाही आणि न्यायालयाने मा. नारायण राणे यांची जामीनावर मुक्तता केली. सत्याचा विजय झाला. गेली वीस महिने आघाडी सरकारने एखादा कार्यकर्ता किंवा संस्था यांना अडकविण्यासाठी केलेला एकही प्रयत्न न्यायालयात टिकला नाही आणि सरकारला न्यायालयाकडून थपडा खाव्या लागल्या. तसेच आताही झाले आहे.

            त्यांनी सांगितले की, राणे यांना अटक करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी कशी दादागिरी केली आणि बळाचा वापर करण्यास सांगितले हे काल दूरचित्रवाणी वाहिनीने दाखविले आहे. भाजपा अनिल परब यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.