‘जन आशीर्वाद यात्रा’ शुक्रवारपासून पुन्हा सुरू करणार : नारायण राणे

अनिल परबांविरोधात कोर्टात जाणार : नारायण राणे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे परवापासून त्यांची ‘जन आशीर्वाद यात्रा’ पुन्हा सुरू करणार आहेत.

गेल्या दोन दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर राणेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी सिंधुदुर्गमधून पुन्हा यात्रेला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राणे यांच्या दौऱ्याचा मार्ग पूर्वी होता तोच असणार आहे.

दरम्यान, नारायण राणेंनी १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पोटशूळ उठलेल्या ठाकरे सरकारने मंगळवारी नारायण राणे यांच्याविरोधात सूडबुद्धीने केलेली अटकेची कारवाई संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे.

परबांविरोधात कोर्टात जाणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अनिल परबांविरोधात कोर्टात जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह विधान केले होतं. त्यानंतर राज्यातील वातावरण तापले आणि अनेक ठिकाणी राणेंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी भाजपा-शिवसेना कार्यकर्ते समोरासमोर देखील आले. त्यानंतर राणेंना अटक करण्यात आली आणि न्यायालयाने उशिरा रात्री त्यांना जामीन मंजूर केला होता. या सर्व प्रकारांनंतर नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनिल परबांविरोधात कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक झाली, तेव्हा शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप माध्यमांवर व्हायरल झाली. ज्यामध्ये ते नारायण राणेंच्या अटकेबाबत बोलताना दिसून आले.

अनिल परब मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना दोन वेळा त्यांना फोन आल्याने पत्रकार परिषद थांबवली होती. यावेळी अनिल परब पोलिसांना कोणताही उशीर न करता नारायण राणे यांना अटक करा, असा आदेश त्यांनी पोलिसांना दिला होता.

आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

मुंबई : अफगाणिस्तानमधील तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील, एवढी झुंडशाही हे महाराष्ट्र विकास आघाडीचे लोक करत आहेत असे आशिष शेलार म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. ‘ज्या प्रकारे सरकार वागत आहे ते पाहून अफगाणिस्तानमधले तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही हे महाराष्ट्र विकास आघाडीचे लोकं करत आहेत’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ‘राणे यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. राज्यसरकार आणि शिवसेनेला गर्भीत इशारा देऊ इच्छितो, सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु. या प्रकरणामध्ये राज्यसरकार ज्या प्रकारे वागतेय अफगाणिस्तानमधले तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही हे महाराष्ट्र विकास आघाडीचे लोक करत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत नक्कीच संयम ठेवायला पाहिजे. त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यानंतरही झुंडशाही आम्ही राज्यामध्ये बघत आहोत. शिवसेनेने हा तमाशा बंद करावा. भाजपा कार्यालयांजवळ हे तमाशे चालू झाले तर भाजपा महाराष्ट्रभर तांडव करेल आणि त्याची जवाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहिल,’ असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कारवाई : दरेकर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात रत्नागिरी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरवर बोलतांना ‘आमची नेते मंडळी कायदेशीर प्रक्रिया करणार आणि न्यायालयाकडून सकारात्मक निकालाची अपेक्षा आहे, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. ‘पोलिसांनी राणे यांना कोणत्या करणावर अटक केली. तसेच जामीन अर्ज कोणत्या ग्राऊंडवर फेटाळण्यात आला हे तपासण्यात येईल. कायेदेशिर जो लढा उभारायचा आहे त्या संदर्भात निश्चितपणे भूमिका घेण्यात येईल. कायदेशीर अटकेची बाजू समजून घेण्यात येईल. त्यानंतर या विरोधात आम्ही अपील करु’, असे दरेकर म्हणाले. ज्याप्रकारे नाशिक पोलीस आयुक्तांनी आदेश काढला, आणि राणेंना अटक होते. कायदा न बघता ही अटक झाल्याचे दरेकर म्हणाले. राजकीय सुडबुद्धीने पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही कारवाई केली, असे देखील दरेकर म्हणाले.

त्यांनी कोंबड्या नको वाघ आणायला हवे होते…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर जळगावातही तीव्र पडसाद उमटले. भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याने जोरदार धुमश्चक्री झाली. दुपारी दीड वाजता हा गोंधळ झाला. यावेळी भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत दोन्ही गटांना दूर केले. भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले की, शिवसेनेने जो प्रकार केला, तो अत्यंत निषेधार्ह आहे. ही शिवसेनेची संस्कृती नव्हे. शिवसैनिक स्वतःला वाघ समजतात तर त्यांनी कोंबड्या आणायला नको होत्या. तर वाघ आणायला हवे होते. त्यांनी महिलांना पुढे केले. त्यामुळे त्यांनी बांगड्या भराव्यात. या आंदोलनाला पोलिसांचे संरक्षण असल्याचाही आरोप त्यांनी केला.

नारायण राणे जेवत असताना पोलिसांकडून धक्काबुक्की, त्यांच्या जीवाला धोका”; प्रसाद लाड यांचे गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्याचे पडसाड राजकीय पटलावर उमटू लागले आहेत. नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजपा नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर टीकेचे बाण सोडले आहेत. जाणीवपूर्वक कोणतीही कलमं नसताना राणेंना अटक केल्याचा आरोप त्यांनी केली आहे. ‘ही अटक निषेधार्ह आहे. नारायण राणे हे लोकप्रतिनिधी आहेत. खासदार आहेत. केंद्रात मंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री आहेत. राणे जेवत असताना पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यांना खेचलं. त्यांच्या हातात जेवणाचं ताट होतं. त्याचा व्हिडिओ मी काढलेला आहे. केंद्रातील कॅबिनेट मंत्र्यासोबत राज्य सरकारने जे वर्तन केले, ते चुकीचे आहे. त्यांना कोणत्या कलमाखाली अटक करण्यात येईल याची देखील कल्पना नाही. आम्हाला अशी भीती आहे की, राणे यांच्या जीवाला धोका आहे. राणे यांना  सहा वाजेपर्यंत असंच ताटकळत ठेवून कोर्टापुढे न नेता त्यांना रात्रभर तुरुंगात ठेवून छळवाद करण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो’, असे भाजपा नेते प्रसाद लाड यांनी सांगितले.