वैजापूर नगरपालिकेला विविध विकास कामासाठी पाच कोटींचा निधी मंजूर

वैजापूर ,१४ जून  /प्रतिनिधी :- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुशोभीकरण व कै.रामरावनाना पाटील नाट्यगृहाचे बांधकाम या दोन्ही विकास कामासाठी राज्याचा नगरविकास विभागाने 5 कोटींचा निधी मंजूर केला आहे. आ.रमेश पाटील बोरणारे व माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

नगरविकास विभागातर्फे राज्यातील नगरपालिकांना वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्यात येते.‌ यात नगरपालिकेचा वाटा दहा टक्के तर राज्याचा वाटा नव्वद टक्के असतो. आमदार रमेश बोरणारे व माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी पाठपुरावा केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी 1 कोटी 10 लाख रुपये व कै.रामराव नाना नाट्यगृहाचे बांधकाम व सुशोभीकरण करण्यासाठी 3 कोटी 90 लाख रुपये असा सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या कामांना आता गती मिळणार असून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे अशी माहिती आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी दिली.

मागील अनेक वर्षांपासुन बंद असलेल्या दिवंगत रामराव नाना नाट्यगृहाच्या बांधकामासाठी शासनाने तीन कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला ही संपुर्ण तालुक्यातील साहित्यिक, कलावंत, रसिक व सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. त्यामुळे शहराच्या मनोरंजन व सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे अशी प्रतिक्रिया पंचायत समितीचे माजी सभापती व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बाबासाहेब जगताप यांनी व्यक्त केली.‌ शिवसैनिकांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला‌. यावेळी माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, डॉ. निलेश भाटिया, लिमेश वाणी, वसंत त्रिभूवन, पारस घाटे, संजय बोरनारे, रणजित चव्हाण, डॉ.परेश भोपळे, महेश बुनगे, संदिप बोर्डे, ज्ञानेश्वर टेके आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.