रेल्वे स्थानकांवर कशासाठी उभारलेत हे शौचालयाचे सांगाडे? अवास्तव कामे आणि लाखोंची लूट

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत निकृष्ट शौचालयावर खर्च केले ६ कोटी ७५ लक्ष रुपये

सुबोधकुमार जाधव

जालना,२३ सप्टेंबर :-दक्षिण मध्य रेल्वेतील अधिकारी कधी काय शक्कल लढवतील आणि बेसुमार पैसा खर्चून नव्हे उधळून आपले  आणि गुत्तेदाराच कसे  चांगभल करतील हे सोदाहरण सांगायचे  ठरले  तर नांदेड ते मनमाड या रेल्वे मार्गावरील लहान स्थानकांवर अपंग आणि सर्वसाधारण महिला व पुरुषासाठी उभारलेले शौचालय वापराविना आहे त्याच स्थितीत पडून आहेत. याचे कारण म्हणजे या शौचालयांना सेप्टिक टँक तर नाहीतच तसेच पाण्याची देखील व्यवस्था नाही.


दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत नांदेड ते मनमाड  मार्गादरम्यान तसेच आदिलाबाद, मुदखेड, परळी वैजनाथ, अकोला या स्थानकांदरम्यान जवळपास ९० लहान रेल्वे स्थानके आहेत. या स्थानकांवर फक्त पॅसेंजर रेल्वे गाड्या काही सेकंदच थांबतात. अशावेळी शौचालयाचा वापर केला जावू शकतो असे गृहीत धरून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शक्कल लढवून एक अपंगांसाठी आणि दोन महिला आणि पुरुषांसाठी असे तीन शौचालयांचे युनिट गेल्या काही महिन्यांपूर्वी उभारले. हे युनिट उभारताना आवश्यक असणारे सेप्टिक टँक आणि त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था याबाबत साधा विचार देखील संबंधित अधिकारी, इन्स्पेक्टर ऑफ वर्क्स (आय.ओ. डब्लू.)आणि गुत्तेदाराने केला नाही ही  विशेष बाब.
या तीन शौचालयांच्या उभारणीसाठी अंदाजे ७ लक्ष ५० हजार रुपये खर्च करण्यात आलेला आहे. असे एकूण ९० लहान रेल्वे स्थानकांवर देखील तीन शौचालय उभारण्यात आले आहेत. त्यामुळे शौचालयांच्या उभारणीवर ६ कोटी ७५ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. या संबधित अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आणि गुत्तेदाराच्या आर्थिक लाभासाठी कदाचित हा खर्च याहीपेक्षा जास्त झाल्याचे दाखवून देयके लाटली असेल, अशी शक्यता देखील सूत्रांनी व्यक्त केली.


जालन्यापासून अवघ्या १० किलोमिटर अंतरावरील सारवाडी या रेल्वे स्थानकावर जावून ‘आज दिनांक’च्या  प्रतिनिधीने शौचालयांचा वापर होतो का विचारले असता,अद्याप आणि यापुढेही वापर करता येवूच शकत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

“अवास्तव कामे आणि लाखोंची लूट”

ही संकल्पना रेल्वेचे अधिकारी प्रत्यक्षात साकारताना दिसून येतात.दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत जालना स्थानक असून यापूर्वीही जालन्यातील रेल्वेच्या मोकळ्या जागांवरील केलेल्या अनेक बोगस कामांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचे दिसून येते. स्थानकासमोरील मोकळ्या जागेत पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर प्लांट उभारण्यात आला. सदर बांधकाम कोणत्याही नियोजना अभावी केले आहे. पिण्याच्या पाण्याचा कायम स्त्रोत नसतानाही लाखो रुपये खर्च करून पाण्याची टाकी, फिल्टर प्लांट व त्यातील साहित्य खरेदी करून प्लांट उभारण्यात आला.

आजमितीस हा प्लांट बेवारस स्थितीत तसाच पडून आहे.या सोबतच परतूर, मानवत, सेलू, लासूर स्टेशन, नगरसोल, या स्थानकावरील मोकळ्या जागेत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधून ठेवण्यात आल्यात. त्यात एक थेंब देखील पाण्याचा आढळून आलेला नाही.