अमित शाह सागर बंगल्यावर! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा

मुंबई ,२३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतलं. त्यानंतर शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले. लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शाह हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले. या ठिकाणी अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं समजतं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते.

सध्या राज्यात आमदार अपात्रतेचा मुद्दा गाजत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सोमवारी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज अमित शाह आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बंद दाराआडची चर्चा त्याचं पार्श्वभूमीवर असल्याचं देखील बोललं जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं होतं. याप्रकरणी त्यांनी वेळ न लावण्याच्या सुचना केल्या होत्या. यानंतर राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊन तुषार मेहता तसं इतर कायदेतज्ज्ञांनी भेट घेतली होती. कायदेतज्ज्ञांनी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी २५ सप्टेंबर रोजी याबाबतची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता.

२५ सप्टेंबर रोजीच्या सुनावणीत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सुनावणीवेळी समोरासमोर येण्याची शक्यता सांगितली जात आहे. राहुल नार्वेकरांकडून त्याबाबतचे संकेत देखील मिळाले आहेत. त्यामुळे २५ सप्टेंबर रोजीच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

जगप्रसिद्ध लालबागच्या राजाचे घेतले दर्शन

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गणेशोत्सवादरम्यान आज महाराष्ट्रात मुंबईतील जगप्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

अमित शाह यांनी मुंबईत वांद्रे पश्चिम परिसरातील प्रसिद्ध गणेश मंडपातही पूजा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याप्रसंगी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री. शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा सौ. वृषाली शिंदे यांनी श्री. शाह यांचे औक्षण केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार आदी  उपस्थित होते.