केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मधील अधिकाऱ्यांचा सत्कार

हैदराबाद ,२३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 42 अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम हैद्राबाद येथे अत्यंत थाटामाटात झाला.


39 व्या रेल्वे संरक्षण दल स्थापना दिनानिमित्त रेल्वे प्रोटेक्शन फोर्स प्रशिक्षण केंद्र, मौला-अली, हैदराबाद येथे प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते .


‘ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे देशाच्या विकासात आपली जबाबदारी पार पाडत आहे आणि भारतीय रेल्वेच्या सुरक्षेमध्ये आणि रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोपा, सुलभ आणि सुरक्षित करण्यात आरपीएफ जवानांचे योगदान अतुलनीय आहे.’ असे दानवे म्हणाले.

आज हैदराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात 42 शूर अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे दानवे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.समारंभात दानवे यांना आरपीएफच्या विविध तुकड्यांकडून भव्य परेडची सलामी दिली त्याचबरोबर दानवे यांनी स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन केले.

यावेळी रेल्वे संरक्षण दलाच्या विविध तुकडीतील कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कला, शौर्य आणि साहसाचे पराक्रम सादर केले.डी.जी श्री मनोज यादव , आय.जी सुश्री सुगंध सिंह ठाकूर , जीएम एससीआर श्री अरुण कुमार जैन, रेल्वे संरक्षण दलाचे अनेक अधिकारी आणि क्षेत्रीय रेल्वेच्या आरपीएफचे प्रमुख अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते.