अचूक कारवाईसाठी अधिकाऱ्यांचा एकमेकांशी संवाद-समन्वय आवश्यक-जिल्हाधिकारी पाण्डेय

छत्रपती संभाजीनगर,२१ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  कायदा व कलमांचा अभ्यास  करून अचूक कारवाई व्हावी यासाठी अधिकाऱ्यांचा एकमेकांशी संवाद आणि समन्वय आवश्यक असून समाजस्वास्थ्यासाठी हे महत्त्वाचे आहे ,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज केले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात प्रतिबंधात्मक फौजदारी  कायदा कलम 107,108,109,110 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 55,56,57 अंतर्गत करावयाच्या कारवाई संदर्भात अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेत पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मनिष कलवानिया, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती महक स्वामी,ए.एस.आय.डी.एम.भांगे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले की, पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करताना  कायद्याचा निट अभ्यास केला पाहिजे तसेच पोलिसांनी एकमेकांशी संवाद आणि समन्वय ठेवणे आवश्यक आहे. हे पोलीस व नागरिकांसाठी महत्वाचे आहे. काही वेळा एखाद्या कलमाची अंमलबजावणी करताना एखादी परिस्थिती उद्भवते. त्यावेळी अशा परिस्थिती काय केले पाहिजे त्यामुळे पोलिसांची कार्यशाळा महत्त्वाची आहे. कार्यशाळेमधून कलमाचे ज्ञान ज्ञान मिळते, एखाद्या क्लिष्ट गुन्ह्यात कोणते कलम लावले पाहिजे.क्लिष्ट विषय काळजीपूर्वक हाताळले पाहिजेत. या सर्व बाबींचा विचार करता अधिकाऱ्यांचे परस्पर सहकार्य महत्त्वाचे असून त्यासाठी संवाद आणि समन्वय असला पाहिजे.पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनीही कायद्यांसंदर्भात मार्गदर्शन केले.