पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार; घरच्या गणपती बाप्पाचे केले कृत्रिम तलावात विसर्जन

ठाणे ,२१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन बुधवारी भक्तीमय वातावरणात झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. यासाठी त्यांनी स्वत: कृतीशिल पुढाकार घेतला. त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन मुख्यमंत्र्यांनी काल (20 सप्टेंबर) रोजी कृत्रिम तलावात केले. त्यांच्या या पर्यावरणपूरक कृतीचे ठाणेकरांनीही मोठ्या प्रमाणात अनुकरण केले.

महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १३ हजार ९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २०२ गणेश मूर्तींचे तसेच ११ सार्वजनिक गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर व अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे  यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी शहरात दीड दिवस, पाच दिवस आणि सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेंतर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड़्स टिकुजीनी वाड़ी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण १५ कृत्रिम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. तर पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख आदी सात ठिकाणी विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रात एकूण ४२ ठिकाणी विसर्जनासाठी विशेष टाकी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.