अंबड -घनसावंगी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा-सतीश घाटगे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जालना ,१८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-यावर्षी पावसात मोठा खंड पडल्याने अंबड -घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी नापिकीला सामोरे जावे लागले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन हातचे गेल्यानंतर आता जिल्ह्यातील प्रमुख महत्वाचे पिक असलेले कपाशी पिक देखील हातातून गेले आहे. गतवर्षी अतिवृष्टीने नुकसान केल्यानंतर यावर्षीही नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी बनला आहे. या संकटात शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे अंबड -घनसावंगी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करण्याची मागणी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भाजप नेते तथा समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी केली.

अंबड -घनसावंगी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सतीश घाटगे यांनी सोमवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले . यावेळी भाजपचे घनसावंगी तालुका अध्यक्ष शिवाजीराव बोबडे, भगवान बर्वे, अनिरुद्ध झिंजुर्डे ,गणेशराव खोजे, कांताराव उडदंगे, भीमराव शेळके, शिवाजी मोरे, भरत परदेशी, बंडू उढाण, सोपान भुतेकर, शिवाजीराव कंटुले, किरण भुतेकर, उमेश बर्वे, आसाराम उढाण, अनिल सातपुते, शफी सय्यद, भागवतराव उढाण, प्रेमानंद उढाण, अन्सार काजी, विलासराव घोगरे, शरद घोगरे, रामेश्वर वैद्य, चंद्रकांत मस्के, रमेश काळे, हरिभाऊ कवडे, रमेश तारगे, सुनीलराव कवडे, शकील पठाण, विलास जाधव, दत्ता निकम, गोरख साबळे, विलाज गव्हाणे, मदन साबळे, पुरुषोत्तम उढाण, ईश्वर धाईत, शिवाजीराव कटारे, राजांबर मते, विष्णुपंत जाधव, संजय तौर यांच्यासह असंख्य शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अंबड घनसावंगी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार व फळबागायतदारांना हेक्टरी १ लाख रूपयाची नुकसान भरपाई देण्‍यात यावी. खरीप हंगाम २०२३-२४ मधील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तात्काळ अग्रिम विमा रक्कम देण्यासाठी आदेशित करण्यात यावे. मागील वर्षीचा पिक विमा तत्काळ खात्यावर जमा करण्यात यावा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. गतवर्षीच्या अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वाटप करावे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा तोडण्यात येऊ नये, तसेच तोडलेला वीज पुरवठा तातडीने जोडण्यात यावा.नापिकीमुळे शेतकऱ्यांकडून पिक कर्जाची वसुली तुर्तास करण्यात येऊ नये. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारे अनदुान तसेच पीकविमा रक्कमेतुन बँकानी कर्ज वसुली करु नये.यासाठी बँकांना सूचना करण्यात याव्यात. फळबागायतदार शेतकऱ्यांचा पीकविमा (मोसंबी,डाळिंब,केळी,आंबा ) मंजूर करून पिक विमा भरपाईची रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी.शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शासनाकडून वरील मागण्याचा संवेदनशीलपने विचार करून सदर मागण्या मंजूर कराव्यात. अशी विनंती सतीश घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.