राजेश टोपे आणि अर्जुन खोतकर हे एकत्र येऊन काँग्रेसचे आमदार गोरंट्याल यांच्या विरोधात षडयंत्र -काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद यांचा आरोप

जालना ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-जालना जिल्ह्य़ातील महाविकास आघाडीच्या राजकारणात पालकमंत्री राजेश टोपे आणि शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर हे एकत्र येऊन  काँग्रेसचे आ.कैलास गोरंट्याल यांच्या विरोधात षडयंत्र रचत असल्याचा  आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी केला आहे.
 नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्यांची नेमणूक करताना टोपे यांना मुस्लिम, दलित, महीला या एकाही प्रवर्गातील कार्यकर्ते आठवले नाहीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डाॅ निसार अहेमद  यांचे यादीत असलेले नाव मुंबईत कोणी वगळले याचा टोपे यांनी खुलासा करावा असे शेख महेमूद यांनी म्हटले आहे.  राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाला जिल्ह्य़ात मात्र अतिशय दुय्यम वागणूक देण्याचे  टोपे  नेहमीच प्रयत्न करतात  सामाजिक समतोल देखील पाळत नाहीत   जालना तालुका संजय गांधी निराधार समितीचे पदसिध्द अध्यक्ष स्थानिक आमदार असतांना  सदर नियुक्ती करतांना  टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नेमणूका केल्या आहेत असा मेहमूद यांनी आरोप केला 
आगामी नगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी टोपे यांनी  राष्ट्रवादीकडून प्रत्येक वॉर्डात शिवसेनेसोबत वेगळी रचना लावली आहे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते फोडण्याचे काम सुरू आहे मात्र काँग्रेस पक्ष स्वबळावर आपले वर्चस्व सिध्द करील असा  विश्‍वास  महेमूद यांनी व्यक्त केला आहे.
. काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर सगळ्या विषयावर जाणीवपुर्वक अन्याय सुरू असल्याची भावना  निर्माण झाली आहे. गोरंट्याल यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नेहमीच आघाडीचा धर्म पाळलेला आहे. मात्र टोपे हे सुरूवातीपासूनच खोतकर यांनाच जवळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. असा आरोप  शेख महेमूद यांनी केला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पालकमंत्री राजेश टोपे यांनी कितीही षडयंत्र रचली तरी काँग्रेसचे बळ कोणीही कमी करू शकत नाही  आगामी नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस स्वःबळावर मैदानात उतरून  पक्षाची ताकद दाखवून देईल असे शेख महेमूद यांनी म्हटले आहे.