मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अर्पिता वाघिणीच्या बछड्यांचे नामकरण

छत्रपती संभाजीनगर,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-   सिद्धार्थ उद्यानातील ‘अर्पिता’ या वाघिणीने काही दिवसांपूर्वी बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचे नामकरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आले.

अर्पिता वाघिणीने दोन नर व एक मादी बछड्याला जन्म दिला होता. त्यांची नावे चिठ्ठी निवडून देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चिठ्ठ्या काढल्या. त्यावरील ‘श्रावणी’, ‘विक्रम’ आणि ‘कान्हा’ अशी नावे या बछड्यांना देण्यात आली. बछड्यांची नावे घोषित होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून बछड्यांचं नामकरण करण्यात आलं. पण, यावेळी एका घडलेल्या प्रसंगामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

नेमकं झालं काय?

वाघांच्या बछड्यांचं नामकरण करण्यासाठी कार्यक्रमस्थळी चिठ्ठ्यांनी भरलेली दोन काचेची भांडी ठेवण्यात आली होती. यातील एका काचेच्या भांड्यातून मुख्यमंत्री शिंदेंनी पहिली चिठ्ठी उचलली. त्या चिठ्ठीवर ‘श्रावणी’ असं नाव लिहिण्यात आलं होतं. त्यानुसार मादी वाघाचं नाव ‘श्रावणी’ असं ठेवण्यात आलं. यावेळी ‘श्रावणात जन्माला आली म्हणून श्रावणी’ अशी टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी केली.

यानंतर अजित पवार यांनी काचेच्या भांड्यातून दोन चिठ्ठ्या उचलल्या. त्यातील एक मुनगंटीवार यांच्याकडं दिली. अजित पवारांनी उचललेल्या चिठ्ठीत ‘आदित्य’ हे नाव आलं. हे नाव वाचताच अजित पवार यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. अजित पवारांनी आपल्या हातातील चिठ्ठी मुनगंटीवार यांना दाखवली. मात्र, ‘आदित्य’ नामकरणास मुनगंटीवार यांनी नकार दर्शवला. ‘आदित्य हे नाव चिठ्ठीत निघालं, ते मागे घ्या’ असं मुनंगटीवार म्हणाले.

नंतर अजित पवार यांनी दुसरी चिठ्ठी उचलली. त्यात ‘विक्रम’ हे नाव निघालं. तर, सुधीर मुनगंटीवार यांनी तिसरी चिठ्ठी काढली. त्यात ‘कान्हा’ नाव आलं. त्यानुसार मादी बछड्याचं नाव ‘श्रावणी’ आणि दोन नर बछड्यांची ‘विक्रम’, ‘कान्हा’ अशी नाव ठेवण्यात आली. मात्र, ‘आदित्य’ नाव टाळल्याने ठाकरे गटाकडून टीका करण्यात येत आहे.

“…म्हणून सरकारला भीती वाटत आहे”

याप्रकरणावरून शिवसेना ( ठाकरे गट ) माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भीती सरकारला वाटते. वाघाचं नामकरण करताना ‘आदित्य’ नाव निघाले. पण, भीती वाटल्याने दुसरं नामकरण करण्यात आलं. आदित्य ठाकरे लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत. म्हणून सरकारला भीती वाटत आहे,” असा हल्लाबोल चंद्रकांत खैरे यांनी केला.