परळीमधील श्री वैद्यनाथ ज्योतीर्लिंग विकास करण्यासाठी २८६ कोटी ६८ लाखांचा आराखडा मंजूर– कृषिमंत्री धनंजय मुंडे

शानदार सोहळ्यात मुक्तिसंग्राम दिन साजरा; बीडला आता बळ मिळणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

पैठण उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी आणणे या उद्देशाने 561 कोटी रुपये निधी मंजूर

बीड ,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास, सिंचनाची व्यवस्था, ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना, या सर्व माध्यमातून बीडला बळ देण्याचे काम केलेले आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.

येथील पोलीस मुख्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी श्री मुंडे बोलत होते. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर स्वातंत्र्यसैनिक समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर समाजसेवक आणि बीडकर जनता मोठ्या संख्येने आजच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित होती. तत्पूर्वी हुतात्मा चौक येथे स्मारकास 21 तोफांची सलामी देण्यात आली. कृषिमंत्री श्री मुंडे यांनी या ठिकाणी पुष्पचक्राची मानवंदना देऊन अभिवादन केले. स्वातंत्र्यसैनिक, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनीही या ठिकाणी मानवंदना देऊन अभिवादन केले.

मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात बोलताना श्री मुंडे म्हणाले, हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत.  या संग्रामाच्या इतिहासात अमर होऊन देशासाठी हुतात्मा झालेल्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकास श्रद्धांजली अर्पण करून  उपस्थित असलेले या संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू- भगीनी आणि सर्व नागरिकांना  मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

श्री मुंडे पुढे म्हणाले,  देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजाम राजवटीखालील हैदराबाद स्वतंत्र होण्यास 13 महिने अधिकचा काळ लागला. हैदराबाद राज्यात असलेल्या मराठवाड्याच्या जनतेने या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, देवीसिंग चव्हाण , भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे तसेच अनेकांनी योगदान दिले. या जिल्ह्याचे भूमिपुत्र विठ्ठलराव काटकर तसेच काशिनाथराव जाधव यांचे नाव घेताना अभिमान वाटतो असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाचा  इतिहास नव्या पिढीपर्यंत नव्याने पोहोचला पाहिजे यासाठी येणाऱ्या काळात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमांना ही त्यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.  सर्वांना प्रेरणादायी ठरेल असा हा संग्रामाचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा आणि त्यातून प्रेरणा घेऊन जिल्ह्याचे आणि मराठवाड्याचे नाव आणखी उंचीवर न्यावे अशी अपेक्षा त्यांनी  याप्रसंगी  व्यक्त केली.

हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजीत पवार हे या भागाच्या विकासासाठी कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आले व विकासाची दिशा ठरविणारे सुमारे ४६ हजार कोटी रूपयांचे प्रकल्प त्यांनी मराठवाड्यास दिले याबद्दल त्यांचे ही आभार श्री मुंडे यांनी मानले.

यंदा पावसाने ओढ दिली त्यामुळे पाण्याअभावी पिके संकटात आली. शेतकऱ्यांची व्यथा जाणणाऱ्या या सरकारने या आधी एक रुपयात “पिक विमा योजना’ राबवली त्यामुळे आपण शेतकऱ्यांना विमा संरक्षणातून जिल्ह्यात 86 मंडळांमध्ये नुकसान लक्षात घेता 25 टक्के अग्रीम मंजूर करण्याची कार्यवाही केली असल्याचे श्री मुंडे यांनी सांगितले.

संपूर्ण बीड जिल्हयाचा कायापालट व्हावा या दृष्टीकोणातून काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले, त्यातदेखील शेतकरी केंद्रस्थानी मानून निर्णय घेण्यात आले आहेत, असे श्री मुंडे यावेळी म्हणाले.

बीड मधील कृषी विभागाच्या कार्यालयासाठी १४ कोटी ९० लाख रुपये यापूर्वीच मंजूर करण्यात आलेले आहेत.

कालच्या बैठकीत बीड येथे सिताफळ व इतर फळांच्या प्रक्रिया उद्योग उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. मुलभूत सुविधा विस्तारात अंबाजोगाई येथील शासकीय कृषी विद्यालयात मुले आणि मुलींच्या वसतीगृहास मान्यता दिली आहे. या सर्वांसाठी ११० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे श्री मुंडे यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात कृषी विभागामार्फत परळी तालुक्यातील उपलब्ध जागेत एक शासकीय कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि त्याचबरोबर सोयाबीन संशोधन, प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच चांगले दिवस येतील, असा विश्वास श्री मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

जायकवाडी टप्पा 2 अंतर्गत पैठण उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी आणणे व पुढे ते पाणी माजलगाव उजव्या कालव्यातून पुढे सुमारे 150 किलोमीटर पर्यंत घेऊन जाणे, या उद्देशाने 561 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, याद्वारे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील सुमारे 85 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे हे सांगताना आनंद होत असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात ऊसतोडीसाठी जिल्हयाबाहेर जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे अशा कामगांरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वांची विनंती लक्षात घेऊन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेत ८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्यातील १६०० मुलींना मिळणार आहे यामुळे यापुढे मुलींचे शिक्षण थांबणार नाही असा असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

काळानुरूप कार्यालयांचे स्वरूप बदलावे यासाठी बीड येथे बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत उभारणीसाठी ६३ कोटीहून अधिक खर्चाचा आराखडा कालच मंजूर केला सोबतच पाटोदा तसेच बीड येथील प्रशासकीय भवन देखील आता नव्याने उभारण्यात येईल यामुळे प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल, असेही श्री मुंडे यावेळी म्हणाले.

जिल्हावासियांचे दैवत अर्थात परळी मधील श्री वैद्यनाथ ज्योतीर्लिंग. या ठिकाणी विकास करण्यासाठी २८६ कोटी ६८ लाखांचा आराखडा मंजूर केला आहे तर, अंबाजोगाई येथील स्थळविकास कामांना देखील मान्यता दिली आहे. असे सांगताना विशेष आनंद वाटत असल्याचे, ते या प्रसंगी म्हणाले.

जिल्हयाचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी शासन स्तरावरून निधी कमी पडणार नाही आणि आपण सारे मिळून नवा बीड घडवू अशी प्रतिज्ञा या मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवात घेऊ या.

मराठा आरक्षण मागणीचा सकारात्मक पद्धतीने शासनाने विचार केला आहे व टिकेल असे आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असा आवर्जून उल्लेख त्यांनी यावेळी केला.

विकास कामांवर भर देताना जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामांची दखल देखील या प्रसंगी त्यांनी घेतली, ऑनलाईन व पारदर्शीपणे ६००रु ब्रास ने वाळू उपलब्ध करून सर्वसामान्यांना त्यांच्या घराचे स्वप्न आकारास आणण्याचा मार्ग राक्षसभुवन येथील जिल्यातील पहिल्या वाळू डेपोच्या लोकार्पणाने मोकळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृत महोत्सवी वर्षात अमृत काळ म्हणून ७५ हजार नोकऱ्या शासन देणार आहे. आरोग्य खात्याची मेगा भरती सुरु झाली आहे, जिल्ह्यात २०१५ नंतर प्रथमच कोतवाल भरती झाली. आज नियुक्ती पत्रे देण्यात . या सर्वांचे अभिनंदन याप्रसंगी त्यांनी केले.

75 वर्षांपूर्वी मुक्त झालेला मराठवाडा आपली ओळख बदलतोय. मागासलेला मराठवाडा आणि मागासलेला जिल्हा बीड हे आता इतिहासजमा होतील. नवा प्रगत बीड जिल्हा अशी ओळख समोर येईल  अशा सदीच्छा त्यांनी याप्रसंगी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच इतर महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ मुंडे यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी घेतल्या.

प्रशासकीय भवन येथील ध्वजारोहण

प्रशासकीय भवन येथे अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी तहसीलदार सुहास हजारे तसेच या इमारतीत असणाऱ्या सर्व कार्यालयांचे प्रमुख यांची उपस्थिती होती.

———————————-

• मुक्ती संग्राम दिनानिमित्त झालेल्या परेड संचलनाच्या परेड कमांडर पोलीस उपाधीक्षक श्वेता खाडे या होत्या. तर सेकंड इन परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक पी.पी दलाई हे होते.

• येथील स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम च्या माध्यमातून मराठवाडा गौरव गीत सादर केले.

• मुख्य शासकीय कार्यक्रमात काही स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये  कचारवाडी येथील जानू वनवे  पाटोदा तालुक्यातील रामभाऊ बडगे, बीड तालुक्यातील मिठू गायके यांचा सन्मान कृषिमंत्री श्री मुंडे यांनी स्वातंत्र्यसैनिक जिथे बसलेले होते त्यांच्या जवळ स्वतः जाऊन केला.

• यावेळी शेतकऱ्यासाठी उपयोगी असणाऱ्या आरोग्य वाहीकेला कृषिमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविला.

———————————————–

मराठवाडा मुक्ती संग्राम गौरव गाथा चित्ररथ बीड जिल्ह्याच्या शंभर गावात फिरणार

हैदराबाद मुक्ती संग्रामाची गौरव गाथा सांगणारे 2 चित्ररथांना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून चित्ररथ रवाना केले. हे चित्ररथ बीड जिल्ह्यातील शंभर गावात फिरून हैदराबाद मुक्ती संग्राम गौरव गाथेची माहिती देतील.

पोलीस मुख्यालयातील मुख्य शासकीय कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोन चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. या चित्ररथांच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवगाथा सांगण्यात आली आहे.
या चित्ररथांना हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी कृषिमंत्री श्री मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून याचा शुभारंभ केला.

याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी कृषिमंत्री श्री मुंडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.