जालना येथे जलशुध्दीकरण केंद्रासाठी रुपये 56 कोटीचा निधी मंजूर  – पणन मंत्री अब्दुल सत्तार

जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द – पणन मंत्री अब्दुल सत्तार

जालना,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबादच्या मुक्ती लढ्यात जालना जिल्ह्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. जिल्ह्यातील हजारो थोर  व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते, त्यांच्यामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. या आपल्या मराठवाड्याच्या विकासासाठी काल पार पडलेले मंत्रिमंडळ बैठकीत विविध लोककल्याणकारी निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जालना जिल्हयासाठीही अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत, जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

हैदराबाद मुक्तिसंग्राम वर्धापन दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण श्री. सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.


प्रारंभी टाऊन हॉल परिसरात असणाऱ्या मान्यवरांनी  लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यानंतर हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तर पोलिस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व पोलिस बँड पथकाने शोकधून वाजवून हुतात्म्यांना मानवंदना दिली. या कार्यक्रमानंतर हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा देताना श्री. सत्तार म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद संस्थानातील या मराठवाडयात त्यावेळी पारतंत्र्य होते. त्या काळात हैदराबादच्या मुक्तीसाठी थोरामोठयांनी फार मोठी कामगिरी बजावली. मराठवाडयाने शौर्याची परंपरा कायम राखली. तळहातावर जीव घेऊन स्वातंत्र्यासाठी लढा देणारी मंडळी आपले घरदार, संपत्ती यांचा तिळमात्र विचार न करता स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन सहभागी झाली होती. सर्व स्तरावर निजामाशी मुकाबला करुन पारतंत्र्याचे जोखड झुगारुन मराठवाडयाला स्वातंत्र्य  मिळवून देण्यात त्यावेळच्या स्वातंत्र्यसैनिकांनी खंबीरपणे जबाबदारी पार पाडली, म्हणून आज तुम्ही-आम्ही ही स्वातंत्र्याची फळं चाखत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना आणि दोन दिवसांनी  हैद्राबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन भारतीय गणराज्यात विलीन झाले.  हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात जालना जिल्ह्याचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील हजारो थोर  व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी  झुंज दिली. प्रसंगी अनेकांनी मृत्युलाही कवटाळले. जात, धर्म विरहित अनेक समूहांनी आपल्या प्राणांची त्यासाठी बाजी लावली.  अनेकांनी आपले प्राण अर्पण केले. या  शूरवीरांना विनम्र अभिवादन.


श्री. सत्तार पुढे म्हणाले की, मराठवाड्यासह संपूर्ण जालना जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने काल  छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत  अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले. मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46  हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. जालना जिल्हयाच्या प्रगतीसाठीही अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  जालना जिल्हयातील स्वातंत्र्यसैनिक दगडाबाई शेळके यांचे धोपटेश्वरे येथे स्मारक उभारण्यासाठी रुपये पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण या वर्षी करण्यात येणार आहे.  याशिवाय जालना आयटीआयमध्ये महत्त्वाचे इन्क्युबेशन सेंटर सुरु करण्याचा निर्णय झाला असून यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सेंटरमुळे शेतकरी, विद्यार्थी, महिलांच्या नवसंकल्पनांना मूर्त रुप येण्यास मदत होणार आहे. अंबड येथील मत्स्योदरीदेवी संस्थानाच्या विकासासाठी 40 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.  जालना शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 35 एमएलडी क्षमतेचे अंबड येथे जलशुध्दीकरण केंद्र आणि 15 एमएलडी क्षमतेचे जालना येथे जलशुध्दीकरण केंद्रासाठी रुपये 56 कोटीचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.  तर जाफराबाद शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेकरीता 47 कोटी 98 लाख निधीची तरतुद करण्यात येणार आहे. अंबड शहरातील भुयारी गटार प्रकल्पासाठी  16 कोटी 56 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परतूर येथे शेतकरी एमआयडीसीसाठी 25 कोटी देण्यात येणार आहे. तर  जलसंपदासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे  जिल्हयाला  सिंचनाकरीता मोठा फायदा होणार आहे. अंगणवाडी, शाळा दुरुस्तीसाठीही भरीव तरतूद करण्यात येणार आहे.  जालना जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.


कार्यक्रमाच्या शेवटी हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह त्यांच्या वारसांची श्री. सत्तार यांनी भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व त्यांचा यथोचित सत्कार केला. यानंतर टाऊन हॉल परिसरात महानगरपालिकेच्यावतीने ‘मेरी माटी, मेरा देश’ अंतर्गत भव्य अमृत कलश यात्रा चित्ररथाचे श्री. सत्तार यांच्या  हस्ते उदघाटन करण्यात आले.