छत्रपती संभाजीनगर येथे ‘सारथी’ संस्थेचे वसतिगृह सुरू करा-आमदार सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  छत्रपती संभाजीनगर येथे सारथी संस्थेचे वसतिगृह सुरू करावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (दि.12) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

         सदरील वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय मुख्यालय सुरू करण्यासाठी तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व लक्षीत गटातील लाभार्थ्यांसाठी अभ्यासिका, मुला-मुलींना वेगवेगळ वसतीगृह इत्यादी प्रयोजनासाठी गारखेडा परिसरातील (छत्रपती संभाजीनगर) सी.टी.एस.क्र.15309 मधील 1.24 हे. आर जमीन नियोजन विभागास प्रदान करण्यास तसेच सदर प्रकल्पाच्या बांधकाम व संचालनाचे काम सारथी संस्थेमार्फत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र सदरील प्रशासकीय मान्यता मिळवून वर्ष होऊनही अद्यापही यासंदर्भात काहीच कार्यवाही झाली नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत यासंदर्भात त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.