राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचे काम कोणी करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर मुख्यमंत्री शिंदेंनी दिले स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जालन्याला जाण्याचे टाळले

मुंबई,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा खोडसाळपणा कुणी करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.जरांगे यांनी अट घातली असली तरी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जालन्याला जाण्याचे टाळले.

घडलेले मुद्दे, प्रसंग आणि घटना मोडतोड करून सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत असताना. या पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा आणि सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार योग्य नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या मुद्द्यांवर सकारात्मक बोलूया अशी चर्चा मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार करीत असताना आमचा संवाद ‘सोशल मीडिया’वरून चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली आणि सकारात्मक भूमिका घेतली असताना, संवादाचा मार्ग प्रशस्त केला असताना खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत.

शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. या पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा आणि सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या राज्याची ही संस्कृती नाही. राज्यात असलेले सकारात्मक वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आवाहन केले आहे.

आपण बोलून मोकळं व्हायचं, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंबंधी जी बैठक झाली त्यानंतरच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला बोलताना दिसत आहेत. हे कथित संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

असा झाला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमका संवाद

एकनाथ शिंदे – आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.

अजित पवार – हो… येस.

देवेंद्र फडणवीस – माईक चालू आहे.

वादग्रस्त व्हिडिओ खरा असेल, तर त्यांना ते खूप महागात पडेल-मनोज जरांगे पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संभाषणाचा वादग्रस्त व्हिडिओ खरा असेल, तर त्यांना ते खूप महागात पडेल, असा इशारा मराठा आरक्षणासाठी गत 16 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मी उपोषणाची जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना भेटण्यासाठी वेळ हवा होता. तो मी दिला, असेही ते यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आंतरवाली जालना दौऱ्यावर भाष्य करताना म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी सायंकाळी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला भेटण्यासाठी यावे. हरकत नाही. पण ते येणार किंवा नाही याची माझ्याकडे कोणतीही खात्रीलायक माहिती नाही. ते आले तर त्यांचे मराठा समाजाच्यावतीने आम्ही स्वागत करतो.

दौरा लांबणीवर

मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यावे, अशी अट घातली आहे. यानुसार शिंदे सायंकाळी जालन्याला जाणार असल्याची चर्चा होती. उपोषण सोडण्यासाठी जालन्यात जाण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार फारसे उत्सुक नव्हते. मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना एवढे महत्त्व द्यावे का, अशी चर्चा सरकारच्या पातळीवर होती. ‘जरांगे यांच्याशी मंत्र्यांचे शिष्टमंडळ चर्चा करीत असून आपणही काल त्यांच्याशी चर्चा केली आहे. चर्चा झाल्यावर त्यांना भेटण्याबाबतचा निर्णय घेऊ, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.