५० वर्षांपूर्वीच्या “प्रबोधन गोरेगाव” चा आज वटवृक्ष झाला – शरद पवार

मुंबई ,२ एप्रिल /प्रतिनिधी :- ५० वर्षांपूर्वी छोटेसे रोपटे लावलेल्या आणि गोरेगांवकरांशी समरस असलेल्या प्रबोधन गोरेगाव या एका चांगल्या संस्थेचा वटवृक्ष झाला असल्याचे गौरवोद्गार खासदार श्री. शरद पवार यांनी आज गोरेगावात काढले. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता शुक्रवार दि. १ रोजी त्यांच्या हस्ते झाली. यावेळी श्री. पवार यांनी संस्थेचे संस्थापक व राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव केला. यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते प्रबोधनाची पन्नाशी या कॉफीबुक टेबलचे आणि या संस्थेच्या गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीच्या चित्रफितीचे उद्घाटन झाले.

खासदार श्री. शरद पवार म्हणाले की, प्रबोधकार ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक वाटचालीत एक वेगळी भूमिका मांडली. समाजातील वाईट प्रवृत्तीच्या विरोधात त्यांनी आपली लेखणी चालवली. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे ते पुरस्कर्ते होते. प्रबोधनकारांचा आदर्श ठेवून आणि त्यांच्या नावाचा उल्लेख असलेली प्रबोधन गोरेगाव या संस्थेने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे

            मुख्यमंत्री म्हणून राज्याचा प्रमुख असतांना अनेक क्रीडा संघटनांशी घनिष्ठ संबध आला. कब्बडी, खोखो या खेळांचे क्रीडामहर्षी शंकरबुवा साळवी यांच्याकडून प्रबोधन गोरेगावच्या कार्याची माहिती मिळत असे.

            गोरेगावात आमदार मृणालताई गोरे यांच्याकडे अनेक वेळा येत असे त्यावेळी त्यांच्याकडून समाजातील समस्यांना उत्तर देण्याचे काम ही संस्था करते त्याचे नाव प्रबोधन गोरेगाव आहे. अशी या संस्थेची ओळख असल्याचा किस्सा सांगितला. राज्यावर आलेल्या संकटाच्या प्रसंगी या संस्थेने मदतीचा हात पुढे केला असल्याचेही श्री. पवार म्हणाले.

प्रबोधन गोरेगाव संस्थेकडून मराठी माणसाला एकत्र ठेवण्याचे काम समर्थपणे सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई मेट्रोच्या मार्गिका क्र.२- अ आणि ७ चे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

एखादी संस्था स्थापन करणे, ती उभी करणे सोपे असते पण ती सातत्याने कार्यरत ठेवणे खूप अवघड काम आहे आणि हेच अवघड काम प्रबोधन गोरेगाव ही संस्था समर्थपणे करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

            मागील ५० वर्षे कला, क्रीडा, संस्कृती व आरोग्य या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या प्रबोधन गोरेगाव या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आपण या देशाचे काही देणे लागतो आणि ते देणे समाजाला देण्याचे काम प्रबोधन करत आहे. प्रत्येकाने हे वाक्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रबोधन गोरेगाव ही संस्था ५० वर्षांनंतर तेवढ्याच हिमतीने व दिमाखात सुरु आहे. मराठी माणसाला एकत्र ठेवणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे आणि तेच काम ही संस्था समर्थपणे करत आहे. याचे संपूर्ण श्रेय मराठी भाषा मंत्री आणि संस्थेचे संस्थापक सुभाष देसाई यांना जाते. श्री. देसाई यांनी अथकपणे काळानुरुप या संस्थेत सुधारणा केल्या. बाळासाहेबांचे ब्रीदवाक्य ८०℅ समाजकारण व २०% राजकारण श्री. देसाई यांनी सार्थ ठरवले आहे. फक्त नेतेगिरी करुन कुणीही मोठा नेता होत नाही, तर कार्यकर्त्यांना मोठं करणारे, त्यांच्यासमोर आपला आदर्श ठेवणारे खरे नेते असतात, हेच श्री. देसाईंनी संस्थेच्या कार्यातून दाखवले आहे. स्वातंत्र्याचे पावित्र्य जपणाऱ्या प्रबोधन या संस्थेचे कार्य ५० वर्षेच नाही तर पुढील अनेक वर्षे असेच अविरत सुरू राहावे, हीच त्यांना शुभेच्छा.

प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक सुभाष देसाई म्हणाले की, १९९० मध्ये पहिल्यांदा गोरेगावचा आमदार झालो तेव्हा, त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांना ५०००० रुपयांचे अनुदान द्या, अशी विनंती केली असता त्यांनी संस्थेला ५ लाख रुपयांचे अनुदान दिले आणि संस्था उभी राहिली. त्यांच्यासारखा मोठा नेता महाराष्ट्राला लाभला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आणि आपल्याला सहकार्य करणारे संस्थेचे सहकारी यामुळे संस्थेचे काम इतरत्र पोहचले असून या संस्थेची वाटचाल सुरू आहे. एकजुटीने आणि सातत्याने काम करत राहिल्यानेच प्रबोधन संस्था ५० वर्षांनंतर आजही जागी आहे आणि यशस्वीरित्या आपली वाटचाल करत आहे.

           हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरु झालेली प्रबोधन ही संस्था मागील ५० वर्षांपासून कला, क्रीडा, संस्कृती आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये सातत्याने काम करत आहे. शालेय विद्यार्थ्यांना खेळांच्या स्पर्धांमध्ये संधी उपलब्ध करून देणे, मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या माध्यमातून १८ वर्षांत ३ लाख रक्तपिशव्यांचे वाटप, प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या माध्यमातून ७०,००० वाचकांची भूक भागवणे, डायलेसिसच्या रुग्णांना व हजारो पूरग्रस्तांना मदत अशा अनेक माध्यमातून प्रबोधन ही संस्था सातत्याने काम करत आहे. हे सर्व शक्य झाले ते सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यामुळेच. गटबाजी करणे, एकमेकांशी स्पर्धा करणे, राजकारणाची ओढ या अवगुणांचा लवलेशही प्रबोधन संस्थेला शिवला नाही. म्हणूनच प्रबोधन संस्था ५० वर्षांनंतर आजही जागी आहे आणि यशस्वीरित्या आपली वाटचाल करत आहे.

            एरव्ही मराठी संस्थांना लागणारा दुहीचा, फाटाफुटीचा शाप प्रबोधनाच्या जवळपासही फिरकला नाही व सर्वानी एकजुटीने काम केल्यामुळेच. प्रबोधन ही संस्था आजही जागी आहे आणि तरीही स्वप्ने पाहायची सवय कायम आहे. तसेच प्रबोधनतर्फे खेड्यातील मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण देणारे केंद्र सुद्धा स्थापन केले जाणार आहे. आणखीही अजून संकल्प आहेत. प्रबोधनच्या स्थापनेपासून दिवंगत बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला, मार्गदर्शन केले. तेच प्रेम आणि जिव्हाळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा मिळत आहे. जेष्ठ कार्यकर्त्यांची ते नावानिशी विचारपूस करतात त्यामुळे हा प्रवास असाच जोमाने सुरु राहील असा विश्वास वाटतो.

            यावेळी मंचावर खासदार अरविंद सावंत, खासदार गजानन कीर्तिकर, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक अजय-अतुल यांनी सादर केलेल्या गाण्यांचा आनंद उपस्थित मान्यवरांनी घेतला.