शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि ६ : शिरोमणी अकाली दल नेते खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा येथे भेट घेऊन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल असे आश्वासन दिल्याची माहिती अकाली दलाच्या नेत्यांनी दिली.

केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या  विरोधात असून त्या अनुषंगाने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली शेतकरी आपल्या देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी व समस्यांचा विचार करणे व त्या सोडविण्यास आपण सर्वांनी  सर्वोच्च  प्राधान्य दिले पाहिजे, असे चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले.

भेटीनंतर अकाली दलाच्या नेत्यांनी सांगितले, “शेतकरी आंदोलनादरम्यानच्या सर्व कार्यक्रमांना आपला पाठिंबा असेल. दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीलाही ते हजेरी लावणार आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले”

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या उग्र आंदोलनात अकाली दलाचा सहभाग असून या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळवण्याचा आणि हे कायदे रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा अकाली दलाचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली.