छत्रपती संभाजीनगरची  पाणीपुरवठा योजना मुदतीतच पूर्ण करा – औरंगाबाद खंडपीठ

टँकर लॉबी निवडून आलेल्या प्रतिनिधींचीच   

विभागीय आयुक्त  सुनील केंद्रेकर यांची बदली खंडपीठाच्या परवानगीशिवाय करू नये

छत्रपती संभाजीनगर,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-  पैठणहून छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या पाणीपुरवठ्याची योजना अटी व शर्तीनुसार डिसेंबर २०२४ पर्यंतच्या मुदतीतच पूर्ण करावी. यासाठी प्रशासन, मजीप्राचे सदस्य सचिव, खंडपीठ नियुक्त समितीने देखरेख ठेऊन कंत्राटदारानेही कामाला गती द्यावी. पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत देखरेख समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची बदली खंडपीठाच्या परवानगीशिवाय करू नये, अशी अपेक्षा न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी व्यक्त केली.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

प्रकल्पासाठी आवश्यक ४० हजार घन मीटर काळी माती व मुरूम उचलण्याची परवानगी कार्यकारी अभियंता कडा यांनी गुरुवारपर्यंत परवानगी द्यावी, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. मजीप्राने कंत्राटदाराला माती पुरवावी, त्याची रक्कम अदा करण्याचे कंत्राटदाराने मान्य केले आहे. कंत्राटदार कंपनीने जलकुंभ बाबतचा शब्द फिरवून न्यायालयाची दिशाभूल केली. कंपनीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी धवंगडे यांना खंडपीठाने ७ जलकुंभ ३१ मार्चला तर ३ जलकुंभ 30 एप्रिलला उभारून देण्यात येईल, असे खोटे सांगून न्यायालयाची दिशाभूल केली, अशा शब्दांमध्ये खंडपीठाने सुनावले. टँकरबाबतही खंडपीठाने महत्त्वाची टिपण्णी केली. टँकर निविदा सामितीच्या मंजुरीनंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. टँकरसाठी निविदा येणा-या नावांमध्ये सदस्यांच्या त्याच – त्या नावांकडेही खंडपीठाने लक्ष घेतले. मनपाने २०१८ ते २३ दरम्यान टँकरव्दारे शहरवासियांना पाणीपुरवठ्या साठी केलेल्या खर्चापेक्षा सुमारे दोन कोटी रुपये उत्पन्न झाल्याचे अँड टोपे यांनी निदर्शनास आणून दिले असता टँकर लॉबी निवडून आलेल्या प्रतिनिधींचीच असल्याची बाब न्यायालयीन मित्र सचिन देशमुख यांनी निदर्शनास आणून दिली. याप्रकरणी मजीप्राकडून अॅड. अमाेल वसमतकर व अॅड. विनाेद पाटील यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आर. एस. धाेर्डे यांनी बाजू मांडली. याप्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, न्यायालयीन मित्र अॅड. सचिन देशमुख, मूळ याचिकाकर्ते अॅड. अमित मुखेडकर, मनपाच्या वतीने अॅड. संभाजी टाेपे, सरकारी वकील सुजित कार्लेकर, अॅड. राहुल करपे आदींनी काम पाहिले.