मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मार्फत आराखडा तयार करावा, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक कृषी मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, महाव्यवस्थापक सुजित पाटील यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या 2022-23 या वित्तीय वर्षाच्या लेख्यांना मान्यता देण्यात आली. मराठवाड्यात सोयाबीन, सीताफळ तसेच इतर कृषी व फळ प्रक्रिया उद्योगाच्या विस्ताराची क्षमता मोठी आहे. त्याचा सविस्तर अभ्यास करून आराखडा तयार करण्यात यावा. शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त लाभ होण्याच्या दृष्टीने महामंडळाने व्यापक आराखडा करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.