विशेष पोलिस आयुक्त पदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती

मुंबई, ४ जानेवारी  / प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या गृह विभागाने बुधवारी वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली.राज्य सरकारने प्रथमच मुंबई विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती केली आहे.

१९९४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, देवेन भारती यांना यापूर्वी जॉइंट कमिशनर कायदा व सुव्यवस्था, मुंबई पोलिस जॉइंट सीपी, ईओडब्ल्यू आणि अतिरिक्त सीपी क्राइम ब्रँच या पदावर नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी ते महाराष्ट्र एटीएसचे प्रमुखही होते.

देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासाठी खास या पदाची निर्मिती केली आहे. देवेन भारती यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर काही महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात तसेच पोलीस खात्यामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

कोण आहेत देवेन भारती?

देवेन भारती हे १९९४ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्वात शक्तीशाली आयपीएस म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्यांनी महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) नेतृत्व केलेले आहे. त्यापूर्वी ते अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखेमध्ये होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासह शहरातील अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासातही त्याचा मोठा सहभाग होता. महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांच्यासाठी खास या पदाची निर्मिती केल्याचे बोलले जात आहे.