धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात:७ आणि ८ क्रमांकाची बरगडी फ्रॅक्चर

बीड/ मुंबई, ४ जानेवारी  / प्रतिनिधी :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला काल रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अपघात झाला. वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. यात धनंजय मुंडेंच्या छातीला मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवले. दुपारी दोन वाजता लातूर येथून विमानाने धनंजय मुंडे हे मुंबईकडे उपचारासाठी रवाना झाले. धनंजय मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले .

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला रात्री १२.३०ला अपघात झाला. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि ग्रामस्थांच्या भेटी घेऊन ते परळीकडे परत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला, 

धनंजय मुंडे हे परळी शहरातील काही नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेत होते. त्यानंतर ते ग्रामीण भागात गेले आणि ग्रामीण भागातून साडेअकरा वाजता रात्री परळी शहरात आले. परळी शहरात आल्यानंतर ते आपल्या राहत्या घराकडे निघाले. रात्री साडे बारा  वाजता धनंजय मुंडे यांनी  त्यांची बीएमडब्ल्यू त्यांच्या घराजवळ असलेल्या मौलाना आझाद चौकामध्ये आली. यावेळी धनंजय मुंडे  यांच्या गाडीची स्पीड चाळीस ते पन्नास असण्याची शक्यता आहे. यावेळी चालकाचा ताबा गाडीवरला सुटल्याने त्यांची गाडी मौलाना आझाद चौकाला जाऊन आदळली. या अपघातामध्ये बीएमडब्ल्यू कारचा पुढच्या भागाच मोठे  नुकसान झाले  आहे. अपघातानंतर लगेच मौलाना अब्दुल आझाद  चौकातून धनंजय मुंडे यांना दुसऱ्या गाडीने तिथून जवळ असलेल्या त्यांच्या घरी नेण्यात आले  होते . त्यानंतर परळीतील डॉक्टरांनी त्यांना घरी जाऊन त्यांची तपासणी केली. धनंजय मुंडे यांच्या काही तपासण्या झाल्या, ज्यामध्ये त्यांच्या छातीमध्ये दोन ठिकाणी छोटेसे फॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले. आता त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले आहे.

धनंजय मुंडे यांच्या अपघात झालेल्या गाडीचा व्हिडीओ समोर आला आहे.व्हिडीओमध्ये दिसत आहे की धनंजय मुंडे यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. गाडीचे बोनेट पूर्णपणे डॅमेज झालेले दिसत आहे. धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागल्याचे  सांगितले  होते . मुंडे मुंबईच्या दिशेने निघाले होते त्यावेळी घराजवळ कार्यकर्ते जमले होते. घरातून निघत असताना मुंडे यांच्या डोक्याला गमजा बांधलेला होता. यामध्ये त्यांच्या कपाळाचा भाग दिसणार नाही याची काळजी घेताना कार्यकर्ते दिसले.  

धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत अपघातासंदर्भात माहिती दिली. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे.यानंतर अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. धनंजय मुंडे यांची ७ आणि ८ क्रमांकाची बरगडी फ्रॅक्चर झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. आता धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक असून त्यांना डिस्चार्ज कधी दिला जाईल, याची माहिती उद्या सायंकाळपर्यंत कळेल, अशी माहिती अजित पवारांनी दिली., “काल (मंगळवार) रात्री अडीच वाजता धनंजय मुंडे यांचा परळीत अपघात झाला. आज त्यांना विशेष विमानाने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांची पूर्णपणे तपासणी केली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांच्या सात आणि आठ नंबरच्या दोन बरगड्यांना फ्रॅक्चर झालं आहे. त्यांना २४ तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.” असंही अजित पवारांनी सांगितलं.