अनिल परब यांची कोट्यवधींची संपत्ती ईडीने केली जप्त

मुंबई, ४ जानेवारी  / प्रतिनिधी :- शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांची कोट्यवधींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने दापोली येथील साई रिसॉर्टच्या संबंधित एकूण १० कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

साई रिसॉर्टशी संबंधित प्रकरणात ईडीने अनिल परब यांच्याविरोधात मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्यांची तीन ते चार वेळा चौकशी देखील झाली होती. याप्रकरणी पर्यावरण खात्याने अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती.अनिल परब यांचे सदानंद कदम यांच्याशी सामंजस्य आहे. त्यातूनच कदम यांना स्थानिक एसडीओ कार्यालयातून बेकायदा परवानगी मिळाली. त्यानुसार शेतजमीनीचे बिगरशेत जमिनीत रुपांतर करण्यात आले. त्यानंतर त्या ठिकाणी सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करत रिसॉर्टचे बांधकाम झाले, असे ईडीच्या चौकशीत समोर आले आहे.

ईडीने ट्विट केले की, माजी मंत्री अनिल परब यांची मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात ईडीने १०.२० कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जप करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील त्यांची ४२ गुंठे जमीन, तिथे बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचादेखील समावेश आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून अनेकदा अनिल परब यांची चौकशी करण्यात आली आहे.

अनिल परब प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. अशी जर कारवाई माझ्यावर करण्यात आली असेल तर मी न्यायालयात दाद मागणार आहे.