राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी चौकशी :नऊ तासांनंतर सुटका

मुंबई,२२ मे  / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. याला आता ९ तास उलटल्यानंतर त्यांची सुटका झाली आहे मात्र, काही कागदपत्रे ईडीसमोर सादर न केल्याने त्यांना त्या कागदपत्रांसह उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलवले आहे. ईडीचे तीन अधिकारी जयंत पाटलांची चौकशी करत होते अशी माहिती मिळाली आहे. आयएल आणि एफएलएस प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवत आहे.

आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली. यावेळी मोठया प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी ईडी कार्यालय आणि राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर पाहायला मिळाली. ईडी चौकशीविरोधात मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर, इतर जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन केले. बरेच पदाधिकारी इतर ठिकाणांहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईला येऊ नये असं आवाहन जयंत पाटील यांनी केले होते.

कार्यकर्त्यांची ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी

जयंत पाटील आज मुंबई येथील ईडी च्या चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी हजारोच्या संख्येने त्यांच्या घराबाहेर गर्दी केली. यात मोठ्या संख्येने वारकऱ्यांचाही समावेश होता. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यलयाबाहेर जमत जोरदार घोषणाबाजी केली. ईडी सुडबुद्दीने कारवाई करत असल्याचे म्हणत कार्यकर्त्यांनी या कारवाईचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ईडी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ठिक्या आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जयंत पाटील यांची ईडी चौकशी पूर्ण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईडी चौकशी पूर्ण करून राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच राज्यभरात त्यांच्या समर्थनासाठी आंदोलन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. ईडीने जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, सर्व कार्यकर्त्यांनी मला तसेच पवार साहेबांना जे समर्थन दिले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्याला लढावे लागणार आहे. आपण अधिक ताकदीने निश्चितच काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व कार्यकर्त्यांनी परत जाताना शांततेने व सुरक्षितपणे जाण्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.