मनपा प्राणिसंग्रहालयात आणखी ३ पांढऱ्या वाघांचे आगमन

छत्रपती संभाजीनगर,७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मनपा प्राणीसंग्रहालयातील पांढरे वाघीन अर्पीता हिने आज रोजी सकाळी ०७:३० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत तीन पांढरे बछड्यास जन्म दिलेला आहे.
अर्पीता वाघीण व बछड्याची तपासणी प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक यांचे मार्फत करण्यात आलेली आहे. दोघांची तब्येत सुदृढ आहे. बछडे आईचे दुध पितांना दिसुन आलेले आहेत. वाघीण स्वतः बछड्याची निगा व काळजी घेत आहे. तसेच केअर टेकर मार्फत सुध्दा बच्छड्याची देखभाल करण्यात येत आहे. तसेच वाघीणीच्या व बच्छड्याच्या २४ तास देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. वीर व अर्पीता या वाघाच्या जोडीमुळे बछड्याचा जन्म झालेला आहे.आज जन्मलेल्या ०३ बछड्या मुळे आता एकूण ०६ पांढरे वाघ झाले आहेत.
अशी माहिती मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आज संध्याकाळी पाच वाजता प्राणी संग्रहालयास भेट दिली व अर्पिता आणि तीचे बछड्यांबाबत विचारपूस केली. यावेळी वाघीण अर्पिता आणि तीचे पिल्ल्यांची चांगली देखभाल केली आणि प्रसूतीच्या काळात काही अडचण निर्माण न करता यशस्वीरित्या प्रसूती केल्याबद्दल मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, पशुधन पर्यवेक्षक संजय नंदन, वाघांचे केअर टेकर मोहम्मद जिया व इतर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
खजूर ने केले तोंड गोड
यावेळी आनंद व्यक्त करताना प्रशासक महोदयांनी हा आनंदाचा प्रसंग तोंड गोढ करून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्या गाडीत पेढ्याचा डबा आहे का? असेल तर आणा असे निर्देश दिले. यावेळी त्यांना कळविण्यात आले की त्यांच्या गाडीत खजूरच्या एक डब्बा आहे, तो डब्बा आणण्यासाठी त्यांनी सांगितले आणि सर्वांना खजूर वाटप करून तोंड गोड केले.