महावितरणच्या बिडकीन विद्युत उपकेंद्राला आयएसओ नामांकन

ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याचे ध्यास घ्या : मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे

छत्रपती संभाजीनगर,२८ ऑगस्ट /प्रतिनिधी :- ‘इज ऑफ ‍लिव्हिंग’ अर्थात जगण्याचा दर्जा वाढवण्यासाठी वीज हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करण्यासह सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा ध्यास महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घ्यायला हवा, असे आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी केले.

बिडकीन येथील महावितरणच्या  33 केव्ही विद्युत उपकेंद्राला राज्यात दुसरे तथा मराठवाड्यातील  पहिले आयएसओ 9001 :2015 मानांकन मिळाले. त्यानिमित्त सोमवारी (28 ऑगस्ट) आयोजित समारंभात मुख्य अभियंता डॉ.केळे बोलत होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता संदीप देशपांडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने, दीपक माने, बिडकीनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे उपस्थित होते. आयएसओसाठी परिश्रम घेतल्याबद्दल सहायक अभियंता अविनाश चव्हाण व त्यांच्या सहकारी यंत्रचालकांचा मुख्य अभियंता डॉ.केळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.केळे म्हणाले की, ‍परिमंडलातील उर्वरित उपकेंद्रे व महत्त्वाच्या आस्थापनांनीही ‍बिडकीन उपकेंद्राचा आदर्श घेत आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवे आणि वीजग्राहकांना दर्जेदार व तत्पर सेवा दिली पाहिजे.

यावेळी आयएसओ मानांकनाचे प्रतिनिधी नंदकुमार देशमुख म्हणाले की, आम्ही सुचवलेल्या सर्व 59 सुधारणा बिडकीन उपकेंद्राने केल्या. सुरक्षित व अखंडित वीजपुरवठ्यासह सर्व निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली. सहायक अभियंता चव्हाण यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळेच हे मानांकन मिळाल्याची भावना व्यक्त केली.

अधीक्षक अभियंता दरोली व गांधेलीचे प्रधान यंत्रचालक श्रावण कोळनूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पैठण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अशोक घुले, सहायक अभियंते गणेश राठोड, ईश्वर तावरे, संतोष सुर्वे, रोहित तायडे, पुष्कर पुरंदरे, राजेंद्र राठोड,‍ विनोद शेवणकर यांच्यासह महावितरणचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.