हैदराबाद मुक्ती संग्राम स्मृती स्मारक उभारणार-पालकमंत्री संदीपान भूमरे

हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आढावा

छत्रपती संभाजीनगर , ८ जून / प्रतिनिधी :- हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य असे स्मृती स्मारक उभारण्यात येणार असून हे स्मारक विद्यार्थी, नागरिक व पर्यटक यांच्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, अशी माहिती पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी दिली.

 विभागीय आयुक्त कार्यालयात हैदराबाद  मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंत्रीमंडळ उप समितीची बैठकीत पालकमंत्री श्री. भूमरे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदिश मिनीयार यांच्यासह व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे आठही जिल्हयाचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.भूमरे म्हणाले, हैदराबाद  मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडयातील आठही जिल्हयात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरातील मध्यवर्ती ठिकाणी स्मारक उभारण्यात येणार आहे. अंदाजे 100 कोटी रूपये खर्चून 200 फुट  उंची असलेले हे स्मृती स्मारक उभारण्यात येणार आहे. दोन वर्षात स्मारकाचे काम पूर्ण होईल. महानगरात एक चांगली वास्तू उभी राहणार असून या स्मारकामुळे विद्यार्थी, नागरिक व पर्यटकांसाठी प्रेरणा देणारे ठरेल.  सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण असे स्मारक असणार आहे. यामध्ये सांस्कृतिक सभागृह, प्रदर्शन हॉल, ग्रामीण कला, हैदराबाद  मुक्ती संग्रामातील आठवणी, इतिहास, ग्रंथालय यासह सर्वच सुविधा असणार आहेत. विद्यार्थी, पर्यटक व नागरिकांसाठी एक चांगले प्रेक्षणीय स्थळ व प्रेरणा देणारे ठिकाण उभे राहणार आहे.

विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी हैदराबाद  मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.