स्त्री जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हाच ती स्वालंबी होते – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माविमकडून महिला आर्थिक प्रशिक्षण

लातूर जिल्ह्यात महिला बचत गटांना वस्तू विक्रीसाठी हक्काची जागा मिळणार

लातूर,७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- स्त्री जेव्हा आर्थिक सक्षम होते तेव्हा ती खऱ्या अर्थाने स्वालंबी होते. त्यासाठी बचत गटाची चळवळ हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि प्रबळ साधन आहे. तुम्ही निर्माण केलेल्या वस्तू कंपन्यांच्या वस्तूशी स्पर्धा कराव्यात एवढ्या दर्जेदार आणि आकर्षित करा. वस्तू विक्रीसाठी ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत हक्काची जागा देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित महिलांसाठी स्वसुरक्षेचे, आर्थिक स्वालंबन प्रशिक्षण आणि 12 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती त्या वेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचेता शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. हनबर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्व्यक मन्सूर पटेल, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे व्याख्याते सतीश कांबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे बाळकुंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्त्रियांना काळा प्रमाणे पुढे जायचं आहे तर स्पर्धेत उतराव लागणार आहे. निर्णय प्रक्रियेत तुमचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे कारण तुमच्यात ती क्षमता आहे. ती क्षमता ओळख करून देण्यासाठी शासनाने महिला बचत गटाला चळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. आता मागे हटायचं नाही, काम करताना ते गुणवत्तापूर्णच होईल यासाठी कष्ट करा असा कानमंत्र जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी दिला. आता तुम्ही तुमच्या वस्तूसह मार्केट मध्ये येत आहात तुमची वस्तू तुमच्या नावासह विकली जावी एवढा उत्तम दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या वस्तू ऍमेझॉनने विकत घ्याव्यात एवढ काम करायचे आहे, तेच लक्ष इथून पुढे ठेवायचं आहे. प्रशासन तुमच्या पाठीशी आहे असा विश्वासही जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्त्रियांना दिला.

हाऊस वाईफ नव्हे होम मेकर
तुम्ही फक्त हाऊस वाईफ म्हणून तुमचं स्थान ठेवायचं नाही तुम्ही घर चालविण्यात महत्वाचा घटक आहात त्यामुळे तुम्ही होम मेकर आहात अशी आत्मबळाची हाक देऊन जिल्हाधिकारी यांनी महिलांना आरोग्य उत्तम ठेवण्याचा मंत्र दिला. लातूर जिल्ह्यात महिला मतदाराच्या प्रमाण पुरुषाच्या तुलनेत कमी आहे. कोणीही महिला मतदान कार्ड पासून वंचीत राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने याठिकाणी स्टॉल उभा केला आहे. कोणाचा पत्ता बदलला असेल, कोणी माहेर वरून सासरला अलं असेल त्यांनी इथे तसा फॉर्म भरून द्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने महिलांसाठीच्या योजना सविस्तरपणे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. हनबर यांनी माहिती दिली. कृषी विभागाच्या योजना बाळकुंदे यांनी सांगितल्या.