माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेत जालना जिल्हावासियांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे – पालकमंत्री राजेश टोपे

मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

जालना, दि. 17 – कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण राज्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. जालना जिल्हावासियांनी संघटीतपणे या मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा श्रीमती संगिता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, माजी उपनगराध्यक्ष शहा आलम खान, एकबाल पाशा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम पालकमंत्री राजेश टोपे यांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले तर पोलीस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून व शोकधुन वाजवुन हुतात्म्यांना मानवंदना दिली.

जनतेला उद्देशुन संदेश देताना पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले,परंतु हैद्राबाद संस्थानातील या मराठवाडयात त्यावेळी पारतंत्र्य होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना आणि दोन दिवसांनी हैद्राबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन भारतीय गणराज्यात विलीन झाले.

मराठवाडयातील थोरामोठयांनी या संग्रामात फार मोठी कामगिरी बजावली. मराठवाडयाने शौर्याची परंपरा कायम राखली. तळहातावर जीव घेऊन स्वातंत्र्यासाठी लढा देणारी मंडळी आपले घरदार, संपत्ती यांचा तिळमात्र विचार न करता स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन सहभागी झाली. सर्वस्तरावर निजामाशी मुकाबला करुन, पारतंत्र्याचे जोखड झुगारुन मराठवाडयाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यावेळेच्या क्रांतीकारी पिढीने यशस्वी जबाबदारी पार पाडली म्हणून आज तुम्ही-आम्ही ही स्वातंत्र्याची फळं चाखत असुन या वीरांनी प्रेरणादायी व स्फुर्तीदायी लढा दिला त्यापासुन सर्वांनी बोध घेऊन काम करण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. जालना जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शेतपीकाचे तसेच फळबागांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु कोरोना समुळ नायनाट करण्यासाठी सर्वांनी संघटीत होऊन स्वयंशिस्त तसेच शासन व प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *