राज्य सरकारचे शिष्टमंडळ रिकाम्या हाती ; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

जालना ,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मनोज जरांगे यांची समजुत काढायला सरकारचं शिष्टमंडळाने आज अंतरवाली सराटी गावात भेट दिली. यावेळी राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे, अर्जुन खोतकर, राजेश टोपे, इत्यादींनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणावर ठाम असल्याचं यावेळी दिसून आलं. आम्ही ओबीसीच आहोत हे आम्हाला समजत नाही. ओबीसी अंगावर येणार नाहीत. आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या. माझ्यावर दबाव आणू नका, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आमरण उपोषण सुरू आहे.. मुख्यमंत्री यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे माजी मंत्री आमदार राजेश टोपे,
माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता..
( छाया अनिल व्यवहारे )

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांच्याकडे ३० दिवसांची मुदत मागितली. पण जरांगे यांनी सरकारला ४ दिवसांचा वेळ दिला आहे. माझी समाजासाठी मरायची तयारी आहे. तुम्हाल आणखी किती वेळ द्यायचा. जर आरक्षण मिळत नसेल तर मला असचं मरु द्या. एकतर आरक्षण मिळेत नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल. जगलो तर तुमचा आणि मेलो तर समाजाचा, अशा भाषेत जरांगे यांनी शिष्टमंडळाला उत्तर दिलं आहे.

आम्ही संयमाने घेत आहोत पण तुम्ही आमचे डोके फोडत आहात. मराठ्यांची पोरं आत्महत्या करत आहेत. आमचा अंत पाहु नका. तुम्हाला मी आणखी चार दिवसांचा अवधी देतो. भरती जवळ आली आहे. लाखांनी लोक आमची बाहेर आहेत. मी समाजाला शब्द दिला आहे. त्यामुळे अध्यादेश काढा तेव्हाचं मी उपोषण मागे गेईन, असं जरांगे म्हणाले.

आमची जात साठ वर्षे बाहेर ठेवली. ५० टक्क्यांची मर्यादा वाढवली आहे. पण आम्हाला आत घेतलं नाही. सरकारी फक्त इच्छाशक्ती हवी. अहवाल आला आहे तर पोरांचं कल्याण करा, असं आवाहन यावेळी जरांगे यांनी केलं.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक असून एक महिन्याच्या आत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांची आज श्री. महाजन यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले की, मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक काल मुंबईत पार पडली. आरक्षणाबाबत नेमलेल्या समितीचा एका महिन्याच्या आत अहवाल प्राप्त होताच निर्णय घेण्यात येईल. मात्र त्याआधीच हे काम पूर्ण होऊन निर्णय घेण्यात येईल. सर्व बाजू तपासूनच निर्णय घेतला जाईल. सरकार आरक्षणाबाबत अतिशय सकारात्मक आहे. उपोषणकर्ते श्री. जरांगे यांनी तब्येतची काळजी घ्यावी. आरक्षणाबाबतच्या प्रक्रीयेस शासन सर्वोच्च प्राधान्य देत आहे. कमी कालावधीत निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.