“आया-बहिणींवर लाठीहल्ला करणाऱ्यांच्या हातात सत्ता ठेवणार नाही”, शरद पवारांचा एल्गार

जळगाव,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :-जालन्यात उपोषण करणाऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. पुरुष, महिला, लहान मुले जखमी झाले. शेतकरी शेतमजूर अनेकांवर लाठीहल्ला करण्यात आला. राजकारण्यांकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आला. आयाबहिणींवर लाठीहल्ला करण्याची नीती असेल त्यांच्या हातात सत्ता ठेवणार नाही, आपण या सगळ्यांचा शंभर टक्के पराभव करु, या लढाईसाठी आपण तयार राहीलं पाहिजे, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. ते जळगाव येथील सभेत बोलत होते.

महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी व शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करणारी आणि युवकांना ज्वलंत करणारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांची जळगाव येथील ‘स्वाभिमान सभा’ प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने मोठ्या उत्साहात झाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री आ. अनिल देशमुख, आ. विद्याताई चव्हाण, पालघर जिल्हाध्यक्ष आ. सुनील भुसारा, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आ. सतीश अण्णा पाटील, माजी आ. गावंडे, माजी आ. संतोष चौधरी, माजी आ. राजीव देशमुख, जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, जळगाव शहराध्यक्ष अशोक लाड वंजारी, जळगाव महिला अध्यक्षा वंदना चौधरी, अरुण पाटील, दिलीप सोनवणे, संजय गरुड, धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, धुळे जिल्हा निरीक्षक उमेश पाटील, बुलढाणा जिल्हा निरीक्षक प्रसनजित पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार जयदेवराव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, भटक्या विमुक्त जाती व जमातीचे राज्यप्रमुख हिरालाल राठोड, सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष महादेव बालगुडे, मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीला सरकारला जबाबदार धरत जोरदार हल्लाबोल केला. राज्यात सर्वत्र दुष्काळ असून जळगाव जिल्ह्यात देखील दुष्काळाच्या छायेत आहे. सध्या राज्यात महागाईस, बेरोजगारी यांसारखे असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत. चुकीच्या लोकांच्या हातात राज्य गेल्यामुळे हे झालं आहे, असा घाणाघात शरद पवार यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. शेतकरी आत्महत्या का करत आहेत, याचा तपास राज्यसरकारने करण महत्वाचं आहे. यावेळी त्यांनी १९८४-८५ चा दाखला दिला. ते म्हणाले, यासाली जळगाव ते नागपूर दिंडी काढण्यात आली. पहिल्या दिवशी हजार लोक होते. दुसऱ्या दिवशी २५, ००० लोक झाले. तर तिसऱ्या दिवशी ५० हजार लोक जमा झाले. या दिंडीत चौथ्या दिवशी एक लाख लोक जमा झाले. नागपूर पर्यंत जात लाखोंचा जत्था जमा झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचं राजकारणात महत्वाचं स्थान असंत. त्याला कुठलीही ठेच पोहचता कामा नये, असं आवाहन पवार यांनी केलं.

फोडाफोडीच्या राजकारणावर टीका

जळगाव येथील सभेत बोलताना शरद पवार यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादीतील फुटीवर उघडपणे भाष्य केलं. ते म्हणाले. केंद्रात मोदी साहेबांचं राज्य आहे. पण मोदींनी काय केलं? नऊ वर्षात इतर राजकीय पक्ष फोडणे, शिवसेना फोडणे, राष्ट्रवादी फोडणे, सत्ता लोकांच्या बाजूने न वापरता इडीचा वापर करायचा, लोकांना वेठीस धरायचं काम भाजप करत असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.

आरक्षणाचा कोटा वाढवण्याची शरद पवार यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. मराठा समाजाला आरक्षण देताना  ओबीसी कोट्यातून आरक्षण  दिल्यास ओबीसीमधील गरीब लोकांवर एक प्रकारे अन्याय होईल, असे देखील शरद पवार  यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरक्षणाचा कोटा वाढवण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

image.png

अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असून त्याकडे आतापासून सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यात लोड शेडींगची समस्या देखील चिंताजनक ठरत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे.

यावर्षी हवा तेवढा पाऊस पडला नाही. पाऊस नसल्याने राज्याची स्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. विमा कंपन्याच्या माध्यमातून एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे आशा निर्माण झाली होती. मात्र, आता शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. ही परिस्थिती केवळ जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यासह अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याचे शरद पवार म्हणाले. विमा कंपन्यांमुळे शेतकरी संकटात सापडला असून त्याकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागितली म्हणजे आदेश त्यांनीच दिले होते, अशी एक प्रकारे त्यांनी कबुली दिली असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी आता राजीनामा देण्याची मागणी देखील शरद पवार यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या आरोपांची सरकारने चौकशी करावी. त्या आरोपांवर आधी उत्तर द्या. पंतप्रधानांनी त्या आरोपांची वस्तुस्थिती सांगावी, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे. नसता असे आरोप करु नये, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे.