छत्रपती संभाजीनगर येथे १५ सप्टेंबरला राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव व राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ

हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजन

छत्रपती संभाजीनगर,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६१ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सव शुक्रवार, १२ सप्टेंबरपासून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

येथील तापडीया नाट्य मंदिर येथे १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत हा महोत्सव होणार असून १५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता ६१ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या कलाकारांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

१२ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत हौशी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम आलेले नाटक “संगीत मंदारमाला”, हिंदी नाट्य स्पर्धेत प्रथम आलेले नाटक “पहचान के नए पंख”,  दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत प्रथम आलेले नाटक “रिले” आणि मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत प्रथम आलेले नाटक “सफरचंद” या सर्वोत्कृष्ट नाटकांचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे.

शुक्रवार दि. १५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता ६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होईल. या समारंभात मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवातील सर्व नाटके व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी नाट्य महोत्सवास व पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.