आंदोलनाच्या आड सामाजिक कार्यकर्ते संपविण्याचे षडयंत्र – हिंदू महासभा

जालना ,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मराठा समाजासह, राजकीय नेते, विविध संघटना यांनी जालना शहरात रास्ता रोको आंदोलन केले होेते. या आंदोलनात दगडफेक, जाळपोळ झाली. यावर पोलिसांनी आयोजकांसह मराठा समाजातील अनेकांवर गुन्हे दाखल केले. हे गुन्हे दाखल करताना पोलिसांनी कोणत्याही प्रकारची शहानिशा केली नसल्याचा आरोप करत केवळ सामाजिक कार्यकर्त्यांना संपविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप हिंदू महासभेचे धनसिंह सुर्यवंशी यांनी केला आहे.


यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आंतरवाली सराटी येथील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात लहान मुले, वृद्ध, महिला यांच्यावरही पोलिसांनी लाठीचार्ज केला. शांततेत सुरू असलेल्या आंदोलन अशा प्रकारे दडपवण्याचा प्रयत्न यातून झाल. ही घटना निदंनिय आहे. आणि या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्य उमटत आहेत. त्यातच मराठा महासंघाकडूनही जालना शहरात या मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्याभरातून मराठा समाज बांधवांसह विविध पक्षाचे राजकीय नेते, विविध संघटनेचे पदाधिकारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी दगडफेक केली, ट्रक जाळली, ही घटनाही निषेधार्ह आहेच. मात्र, ज्या लोकांनी हा प्रकार केला त्या लोकांना सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिसांकडील व्हिडीओ रेकॉडिंंगच्या माध्यमातून शोधून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. असे असताना केवळ आयोजनासंदर्भात परवानगीचे पत्र दिल्यामुळे मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षांना प्रथम आरोपी करण्यात आले हे योग्य नसल्याचे धनसिंह सुर्यवंशी म्हणाले.
केवळ मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुखच नव्हे अशोक पडुळ, युवा उद्योजक शाम सिरसाठ, सरपंच राहुल गवारे, विष्णु पाचफुले, प्रशांत वाढेकर यांच्यासह ईतरांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ती सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती आहेत. केवळ मराठा समाजालाच नव्हे तर इतर समाजाच्या प्रश्‍नांवरही हे सामाजिक कार्यकर्ते लढण्यासाठी नेहेमी अग्रेसर असतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे मनोधैर्य खचविण्याचे काम येथे होत आहे. भविष्यात समाजासाठी बोलावं, लढावं की नाही अशी परिस्थिती या प्रकारामुळे निर्माण होणार आहे. उपोषणे-आंदोलने करण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही. यायचं जरी झालं तर आयोजक कोण आणि परवानगी कुणी मागावी याचीही अडचण निर्माण होईल. या सर्व बाबींचा कदाचित विचार करूनच असे लढणारे-बोलणारे सामाजिक कार्यकर्ते अशा पद्धतीने संपविण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप श्री धनसिंह सुर्यवंशी यांनी केला आहे. आंदोलनांत जाळपोळ करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा व खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या अशी मागणीही त्यांनी शेवटी केली आहे.