जालना जिल्ह्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

जालना ,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यात उद्योग, व्यापारासह सार्वजनिक वाहतुक व्यवस्था तसेच जनजीवन पूर्ववत होण्यासह शांतता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह सकल मराठा समाजाचे समन्वयक, सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाकडून शैक्षणिक नोंदी, खासरा प्रमाणपत्र तसेच निजामकालीन दाखले मागविले होते, तरी 1960 पुर्वीचे कागदपत्रे शोधून ती शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. दरम्यान, लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अशांतता पसरविणाऱ्या लोकांवर करडी नजर ठेवली जाईल. जिल्ह्यात आज शांततेचे वातावरण असून ते अबाधित राहण्यासाठी सर्वांनी जिल्हा व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पोलिस अधिक्षक श्री.बलकवडे म्हणाले की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. अंतरवाली सराटी येथील अनुचित प्रकाराचा पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणे तपास करण्यात येवून दोषीविरुद्ध कारवाई करण्यात येईल

तसेच जिल्ह्यात कालपर्यंत केवळ 162 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल करण्यात आलेली कलमे कमी करण्याचे अधिकार असून चार्जशिट दाखल करतेवेळी कमी करण्यात येतील. तरुणांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रफितीवर विश्वास ठेवू नये तसेच फॉरवर्ड करु नये, लाठीचार्जप्रकरणी अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना हे पारदर्शकपणे तपास करुन चौकशी करत आहेत. नागरिकांनी पोलिस प्रशासनावर विश्वास ठेवावा. खरे गुन्हेगार शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांकडे असलेले पुरावे, जबाब, साक्षीदार तसेच आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिस अधिक्षक कार्यालयातील विशेष कक्षात जमा करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आंदोलन दरम्यान ज्या व्यक्तींनी हिंसा केली त्यांच्यावर कायद्यान्वये कडक कारवाई करावी तसेच निरपराध लोकांवरील गंभीर स्वरुपात दाखल गुन्हे मागे घ्यावेत व अनुचित प्रकारची नि:ष्पक्षपातीपणे चौकशी करावी, अशा सूचना केल्या. बैठकीस सकल मराठा समाजाचे नागरिक, सदस्य, पदाधिकारी, महिला उपस्थित होते.