जालना हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी, ‘विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक संसदेत आणा’

मुंबई/जालना ,२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-शिवसेना (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केंद्र सरकारने मराठा आणि इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी विधेयक संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात मंजूर करावे, अशी मागणी केली. मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागल्यानंतर ठाकरे यांची ही मागणी पुढे आली आहे.

येथे शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांना संबोधित करताना, उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जला ‘सरकारचा क्रूरपणा’ असे म्हटले. ‘कोणाच्याही सूचनेशिवाय पोलीस असे कसे वागू शकतात?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. 

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले … 

काल शासकीय अत्याचार झाला. नुसता निषेध व्यक्त करुन होणार नाही. सरकार कोण तर एक फुल दोन हाफ. लोक उपोषणाला बसले होते. आपली इंडियाची बैठक सुरु होती त्यावर पत्रकार परिषद घ्यायला वेळ आहे पण आंदोलनकर्ते बसले तिकडे कुणालाच मंत्र्यांना वेळ नाही. एक फुल दोन हाफला माहिती नव्हती उपोषण सुरु आहे. बारसुला, वारकरी, काल मराठा समाजाच्या आंदोलनात अत्याचार झाला. तुमच्या आदेशाशिवाय पोलीस असे वागूच शकत नाही. सरकार आपल्या दारी थापा मारतय लय भारी हा कार्यक्रम त्यांना तिकडे घ्यायचा होता पण आंदोलनकर्ते म्हणाले कुणाला आमच्याशी बोलायला येऊ द्या. आता सरकार म्हणतय चौकशी करु दोषींना सोडणार नाही.

सगळे कायद्यासमोर समान असतील तो समान नागरी कायदा. गणपती येताहेत तेव्हा विशेष अधिवेशन बोलावलय. मुहूर्त काढणारे ज्योतिषी आणले कुठून. उत्सवाच्या काळात का अधिवेशन. मणिपूर बाबत तुम्ही अगदी थोड बोललात. पितृपक्षात घ्या ना. अधिवेशन घेताय मी स्वागत करतो पण, तुम्ही विशेष अधिवेशनात मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी सगळ्यांना वटहुकूम काढून आरक्षण द्या.

“यांच्या केसाला धक्का लावला तर मी अख्खा महाराष्ट्र…”, जालन्यातून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपोषणाच्या ठिकाणी जाऊन आंदोलक मराठा बांधवांची आणि लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या पीडितांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारला जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा आहे. परंतु, त्या कार्यक्रमादरम्यान या उपोषणाची अडगळ नको म्हणून हे राज्यकर्ते आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य सरकारला काही काम नाही म्हणून शासन आपल्या दारी असा कार्यक्रम ते घेत आहेत. येत्या काही दिवसात तुमच्या इथे (जालन्यात) हा कार्यक्रम त्यांना करायचा होता. म्हणून तुम्हाला जबरदस्तीने इथून उठवायला निघाले आहेत. त्यांच्या कार्यक्रमात ही अडगळ त्यांना नको होती म्हणून तुम्हाला हुसकावून लावायला निघाले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य सरकारच्या या निर्घृणपणाचा जाब विचारावा लागेल. त्यासाठी आपल्याला थोडा संयम ठेवावा लागेल. मराठा समाजाचं, त्यांच्या मोर्चांचं आणि आंदोलनांचं नेहमीच कौतुक झालं आहे. इतके मोठे मोर्चे निघाले, परंतु, त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे सर्वांनीच तुमचं कौतुक केलं आहे. मी आत्ता जरांगे पाटलांना म्हटलं तुमची देहयष्टी बघा, त्यात हे उपोषण करताय. दुसऱ्या बाजूला हे सरकार जिथे माता-भगिनींची टाळकी फोडायला हे लोक मागेपुढे बघत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आम्ही तुमच्या बरोबरच आहोत.

माजी मुख्यमंत्री म्हणाले की मला आत्ताच जरांगे पाटील म्हणाले, “आज रात्री आणखी पोलीस आणून आम्हाला इथून उठवतील”. त्यामुळे मी या सरकारला आव्हान देतोय. इथल्या लोकांच्या केसाला जरी हात लावलात तर मी अख्खा महाराष्ट्र इथे आणून उभा करेन. हे कोणी अतिरेकी नाहीत, चीन किंवा पाकिस्तानातून आलेले लोक नाहीत. हे इथल्या मातीत जन्माला आलेले लोक आहेत. इथले राजे आहेत.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मी या निर्घृण सरकारला सांगतोय, तुम्ही चुकीच्या लोकांशी पंगा घेतलाय, हे रझाकारांशी लढणाऱ्या लोकांचे वारसदार आहेत. शूरवीरांचे वारसदार आहेत. ही संतांची भूमी आहेच, पण ही वीरांचीदेखील भूमी आहे. इथल्या लोकांनी संतांची शिकवण अजून सोडली नाही, ती सोडायला तुम्ही भाग पाडू नका. रझाकारांच्या विरोधात लढा देणारी ही माणसं आहेत. यांच्याबरोबर पंगा घेऊ नका.