आंदोलकांविरोधात बळाचा वापर करण्याची गरज नव्हती- शरद पवार

अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी शुक्रवारी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान आज सकाळपासून आंदोलनाच्या ठिकाणी आणि जखमी गावकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी अनेक राजकीय नेतेमंडळी जालना दौऱ्यावर पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचवेळी शरद पवार आणि उदयनराजे भोसले  एकाचवेळी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी काल नेमकं काय घडलं याबाबत माहिती जाणून घेतली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार गावांमध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली .तसेच अंबड रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. आंदोलकांसमोर शरद शरद पवार नेमके काय म्हणाले त्यांच्याच शब्दांत… 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अन्य भागांमध्ये तरुण पिढीला काही सवलती मिळाव्यात यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. जालना जिल्ह्यामध्ये आज आपण या ठिकाणी बघतो आहोत की, एखादी व्यक्ती एखाद्या कामासाठी वाहून घेते त्या कामाचा विचार राज्यकर्त्यांनी करावा म्हणून शांततेच्या मार्गाने संघर्ष करतो. मनोजने काही दिवसांपासून एक व्रत घेतलेलं आहे ते व्रत समाजाच्या मुलांना सवलती मिळाव्यात यासाठी आहे. यापूर्वी छोटी-मोठी आंदोलनं केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय केला आणि चर्चा झाली. त्यावेळी अनेक आश्वासने दिली गेली. दुर्दैवाने जे काही ठरलं होतं त्याची अंमलबजावणी झाली नाही. शेवटी मनोज ने निर्णय घेतला की, आता समाजासाठी सगळ्यांची किंमत द्यायला लागली तरी किंमत द्यायची आणि त्यासाठी हा उपोषणाचा कार्यक्रम हातात घेतला.

आजचा दिवस उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मी आज सगळी माहिती घेतली सरकारचे अधिकारी, पोलीस अधिकारी मनोज आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करायला या ठिकाणी आले. एका बाजूने चर्चा सुरू होते आणि दुसऱ्या बाजूने मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी आणले गेले. चर्चा चालू असताना एका बाजूने बळाचा वापर करून काही संबंध नसलेल्या लोकांच्यावर लाठी हल्ला केला गेला, बळाचा वापर केला. एवढेच नाही तर हवेमध्ये गोळीबार केला असं कानावर आलं आणि त्याशिवाय बंदुकीतून छर्रऱ्यांचा वार सुद्धा केला. आता मी हॉस्पिटलला जाऊन आलो. त्या हॉस्पिटलमध्ये काही लोक असे होते की, त्यांच्या अंगावर छर्रे मारले गेले, छोट्या-छोट्या गोळ्या मारल्या गेल्या. त्यांचे ऑपरेशन करण्यात आले आणि आज जालना जिल्ह्यात जेवढी महत्त्वाची सरकारी हॉस्पिटलं आहेत, आज त्या ठिकाणी अनेक जखमी झालेले लोक आहेत. प्रश्न हा सोडवून घेण्यासाठी लोकशाहीमध्ये अधिकार असतो. या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे कुठलाही कायदा हातात घेतलेला नाही, कुठेही दंगा झालेला नाही आणि असे असताना पोलीस बळाचा वापर करणं हे योग्य नव्हतं, त्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने शांततेने आपल्या मागण्यांसाठी जो कार्यक्रम या ठिकाणी चालू होता, त्या कार्यक्रमाला एका दृष्टीने बदनाम करण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी झालेला आहे.

मी एवढेच सांगू इच्छितो की, आज सबंध देशामध्ये एक वेगळं चित्र आहे. आज जी मागणी इथे आहे त्या मागणीसाठी देशामध्ये तुम्हाला माहीत नसेल काही राज्यांमध्ये आज सवलती दिलेल्या आहेत. जिथे सवलती दिलेल्या आहेत त्यापेक्षा वेगळी काही मागणी या ठिकाणी नाही. आज तुम्ही महाराष्ट्राबाहेर गेलात, गुजरातमध्ये गेलात, मध्यप्रदेशमध्ये गेलात तर इथली जी मागणी आहे, त्या मागणीच्या संदर्भात निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पाठीमागच्या काळामध्ये हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्यानंतर काही लोकांनी कोर्टातून त्यावर स्थगिती आणली. त्यानंतर हा निर्णय लांबणीवर पडला. आता हा निर्णय सरकार सांगून घेत नसेल तर या मार्गाला आपल्याला यावं लागेल. आज जो या ठिकाणी काही वैयक्तिक स्वार्थ नाही आजचं या ठिकाणचे उपोषण हे स्वतःच्या फायद्यासाठी नाही. हे उपोषण समाजाच्या तरुण पिढीसाठी व त्यांचे भवितव्य घडवून आणण्यासाठी काही निर्णय घेतले पाहिजे त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून या गृहस्थांनी पाण्याचा घोटही घेतलेला नाही. एवढा त्याग आज समाजाच्या तरुण पिढीसाठी कोणी या ठिकाणी करत असेल तर तुमची माझी जबाबदारी आहे की या सर्व गोष्टींमध्ये सरकारवर दबाव आणण्यासंबंधित जे काही शांततेने, आंदोलन बदनाम होईल अशी परिस्थिती निर्माण होऊ न देता हा जो समाज आहे ते केल्याशिवाय राहणार नाही.

मला आनंद एका गोष्टीचा आहे की, आज सुरुवातीला या समाजाचं एक आदराचं स्थान म्हणजे सातारचे छत्रपती. शिवाजी महाराजांच्या घराण्याचे उदयनराजे आज या ठिकाणी बाकीचा कसलाही विचार न करता इथे उपस्थित आहेत, त्याचंही मला मनापासून समाधान आहे. ज्या वेळेला असे प्रश्न येतात त्या वेळेला उदयनराजे आपण महाराज आहोत, आपण राजे आहोत याचा विचार न करता आपण समाजासाठी आहोत ही भूमिका घेतात, त्यामुळे ते आज या ठिकाणी आलेत. पुन्हा एकदा मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढंच सांगतो की, तुम्ही आज संघर्ष करा आणि आपल्यामागे ठिकठिकाणी तरुण पिढी उभी राहील कशी? आणि त्यांच्या पारड्यामध्ये न्याय पडेल कसा याची खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून घेऊ, एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.