नाथ षष्ठीसाठी पालख्यांचे श्रीक्षेत्र पैठणकडे प्रस्थान

जालना,२० मार्च /प्रतिनिधी :- शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या जलसमाधी सोहळा ( नाथषष्ठी) निमित्त  श्रीक्षेत्र पैठण येथे पालख्या जात आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा खुर्द येथील ह. भ. प. किरण महाराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पालखीचे  जालन्यात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी भाविकांनी भोजन, चहा, फराळाची व्यवस्था केली . 
वै ह .भ.प.दत्तात्रय महाराज पिसे  यांच्या प्रेरणेतून सुरु असलेली पालखीची परंपरा  कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे दोन वर्ष  थांबली होती.  यंदा  वारकऱ्यांमध्ये नाथांच्या दर्शनासाठी प्रचंड उत्साह दिसून आला. जालना शहरात विसावा घेतल्यानंतर सकाळी चहा, फराळ व दुपारचे भोजन करून पालखीने पुढील मार्गास  प्रस्थान केले. पालखीत झेंडेकरी, टाळकरी ,मृदंगाचार्य ,भजनी मंडळ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मुखी राम नाम, भजन, गवळण ,हरी नामाचा गजर करत दिनांक 22मार्च रोजी श्रीक्षेत्र पैठण येथे  सद्गुरू सोपान काका महाराज देहूकर यांच्या फडावर पालखी पोहोचेल.  नाथ षष्ठीचा सोहळा आटोपल्यानंतर पालखी प्रस्थान करेल. असे ह .भ .प .किरण महाराज शिंदे व ह .भ.प .गजानन शिंदे यांनी सांगितले.