दोन दिवसात शासनासोबत आंदोलकांची बैठक -छत्रपती उदयनराजे

छत्रपती उदयनराजे, संभाजी महाराज यांची आंदोलनास भेट

जालना,२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-अंबड तालुक्यातील सराटे आंतरवाली येथील मराठा आरक्षण आंदोलनास छत्रपती उदयनराजे भोसले यांनी  शनिवार रोजी दुपारी ३ वाजता भेट दिली. यावेळी संवाद साधताना दोनच दिवसात राज्य सरकार सोबत आंदोलकांची बैठक घडवून प्रकरणाचा तोडगा काढण्याचे ठोस आश्वासन उदयनराजे यांनी दिले. उदयनराजे यांच्या बरोबरच छत्रपती संभाजी महाराज, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार बंडु जाधव यांनी देखील आंदोलनात दिवसभरात भेटी दिल्या.
 आपल्या खास शैलीत आंदोलकांशी संवाद साधताना उदयनराजे भोसले म्हणाले की, घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. शासनाने तात्काळ याची चौकशी लावावी. जखमींवर योग्य प्रकारे उपचार व त्यांना योग्य मदत द्यावी. इतर समाजाला न्याय मिळतो मग मराठा समाजाला न्याय का? मिळत नाही. असा प्रश्नही उदयनराजे यांनी उपस्थित केला. जेव्हा अन्याय होतो तेव्हा उद्रेक होणे स्वाभाविक आहे. या राज्यामध्ये ५७ महामोर्चे शांततेत निघाले एकाही मोर्चात अनुचित प्रकार घडला नाही. यामुळे समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे आव्हान उदयनराजे यांनी केले. मराठा समाजाला न्याय मिळत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाला सोबत घेऊन राजकारण केले. आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत त्यांचे पाईक आहोत. सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकार राज्य सरकार या सर्वांनी पुढे येऊन हा प्रश्न निकाली काढावा असे आवाहनही उदयनराजे यांनी केले. येत्या दोन दिवसात आपण राज्य शासनासोबत सराटे आंतरवाली येथील आंदोलकांची बैठक लावून व हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करू. समाजातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. मनोज जरांगे आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेच, मात्र त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुद्धा ते महत्त्वाचे आहे. या भूमिकेतून आपण या बाबीकडे लक्ष देत आहोत. असे छत्रपती उदयनराजे यांनी सांगितले.
सुरुवातीपासून या आंदोलनाची माहिती मनोज जरांगे यांनी दिल्यानंतर ते म्हणाले की, छत्रपती उदयनराजे हे आमच्या सगळ्यांसाठी देव आहे. राजांनी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन या प्रकरणात लक्ष घातले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. राजेंच्या प्रयत्नामुळे राज्य शासनासोबत बैठक होईल, मात्र बैठक झाली नाही तरी आम्ही आंदोलन सुरूच ठेवू राजांवर आमची नाराजी असणार नाही असे भावनात्मक उद्गार जरांगे यांनी काढले.