शासनाच्या योजनांचा लाभ घेत तरुण- तरुणींनी उद्योग उभारून स्वावलंबी व्हावे —- पालकमंत्री राजेश टोपे

जालना दि. 18 :- कोरोनाच्या महामारीच्या काळात सर्वसामान्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देत आर्थिक दृष्टीने बळकट करण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक तरुण- तरुणींना घेऊन उद्योगधंदे उभारुन स्वावलंबी होण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

घनसावंगी येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अनुषंगाने तरुण-तरुणींसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल, तहसिलदार नरेंद्र देशमुख, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे कॉर्डिनेटर सचिन पवार आणि सहकारी सचिन गांधी, शामराव पवार, उत्तममामा पवार, मनोज मरकड, कल्याणराव सपाटे, नंदकुमार देशमुख, रघुनाथ तौर, राम सावंत, भागवत रक्तारे, बन्सीधर शेळके, सतिश होंडे, भाऊसाहेब कनके, बाबासाहेब नरवडे, रजियोद्दीन पटेल, संजय पटेकर, बाबासाहेब गायकवाड, भागुजी मैंद, अमोल लहाने यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री टोपे म्हणाले शासनामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना छोट्या-मोठ्या उद्योगासाठी या योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींनी एका नव्या उमेदीने व्यवसाय उभारून नव्याने सुरुवात करण्याचे आवाहनही श्री.टोपे यांनी यावेळी केले.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी तरुणींना 35 टक्के तर तरुणांना 25 टक्के सबसिडी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरुण-तरुणींनी आपल्या भागात कोणता उद्योग यशस्वी होऊ शकतो याचा अभ्यास करून उद्योगाची निवड करावी.तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगाची कास धरून इतरांना नोकरी देण्याची क्षमता आपल्या अंगी वृद्धिंगत करण्याचे आवाहनही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले. जालना जिल्ह्याबरोबरच मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिली.