मराठा आरक्षणासाठी कुक्कडगाव येथील तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षण मिळावे,म्हणून मी स्वतःहून फाशी घेत आहे

जालना ,२९ऑक्टोबर / प्रतिनिधी :-अंबड तालुक्यातील कुक्कडगाव या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी एका २७ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे.शनिवारी रात्री अकराच्या वाजेच्या सुमारास कुक्कडगाव शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.अजय रमेश गायकवाड (वय २७,रा.कुक्कडगाव) असे त्या तरुणाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,मराठा आरक्षणासाठी अजय शनिवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे जात असल्याचे सांगितले.काही काळ त्याने कुक्कडगाव येथील तरुणांसोबत आरक्षणाची चर्चा केली.त्याने कुक्कडगाव शिवारातील शेतात जाऊन आत्महत्या केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी हजर झाले.पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी मिळून आली आहे त्यामध्ये लिहिले आहे की,”मी अजय गायकवाड मराठा आरक्षण मिळावे.म्हणून मी स्वतः हुन फाशी घेत आहे.”असे चिठी मध्ये लिहिलेले आढळले.अजयच्या मृतदेहावर रविवारी सुखापुरी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.सायंकाळी पाच वाजता कुक्कडगाव येथील स्मशानभूमी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजयचे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते.त्याला २ वर्षाची मुलगी आहे.त्याच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झालेले आहे.त्याच्या पश्चात पत्नी,मुलगी,आई व एक भाऊ आहे.घटनास्थळी अंबड येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन,पोलिस बीट जमादार कुटे,गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे,मंडळ अधिकारी जायभाये,बीट जमादार बाबासाहेब खवल,उद्धव गायकवाड राजेंद्र गायकवाड,दीपक पटेकर,जनार्दन गायकवाड,गणेश गायकवाड आदींची उपस्थिती होती.