घरगुती गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त होणार

नवी दिल्ली : सर्वसामान्य गृहिणींना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी करण्याचा विचार करत आहे.उज्वला योजनेच्या सिलिंडरवर ४०० रुपयांची सूट देण्यात आली आहे.  सबसिडी स्वरुपात ही सूट मिळेल.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. या योजनेचा लाभ हा ७५ लाख उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. देशात विरोधकांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. आघाडीतील विरोधक महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला जाब विचारणार आहेत. त्यात केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती दोनशे रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्यासंदर्भात विधान केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतलेला असून उद्यापर्यंत त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

भाजप सरकारचे लक्ष्य आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकांवर आहे. शिवाय तेलंगना राज्यातही याच वर्षी निवडणूक होणार आहे. त्याचा थेट फायदा व्हावा यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे या निर्णयामधून दिसून येत आहे.

दरम्यान, मागे एकदा असेच केंद्र सरकार गॅसच्या किमती कमी करणार असून पीएम किसान सन्मान निधीच्या मोबदल्यातही वाढ करणार आहे, असे सांगण्यात आले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही. यावेळी सरकार खरंच घोषणा करणार का? हे उद्यापर्यंत कळेलच. पण तसे झाले तर घरगुती गॅस २०० रुपयांनी स्वस्त होईल.