पंतप्रधान मोदी करणार सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच ते सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता इंडिया गेट येथे हा कार्यक्रम होणार आहे.

सर्वप्रथम, इंडिया गेटच्या मागे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. अनेक दशकांपूर्वी राजा पाचवा जॉर्ज यांचा पुतळा ज्या छताखाली ठेवण्यात आला होता, तिथे सुभाषचंद्रा बोस यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. यानंतर पीएम मोदी इंडिया गेटजवळ बांधलेल्या स्टेप्ड प्लाझाची पाहणी करतील. त्यानंतर पंतप्रधान कॅनॉल ब्रिजकडे जातील, तिथे कार्यकर्त्यांशी चर्चा होईल. यानंतर, पंतप्रधान एका प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. त्यानंतर नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी पंतप्रधानांचे मंचावर स्वागत करतील. नेताजी बोस यांच्याविषयी दृकश्राव्य सादरीकरण होणार आहे. रात्री ८ वाजता पंतप्रधानांचे भाषण होणार आहे. रात्री ८.३० वाजता नेताजी बोस यांच्या जीवनावर आधारित ड्रोन शो सादर करण्यात येईल.

विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत विस्तारलेला सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू ८ सप्टेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, लहान मुलांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि नवी दिल्लीतील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत ठराविक रस्त्यांवर सामान्य वाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही.